News

महासंघाची स्थापना १९५८ मध्ये झालेली असून महासंघाच्या उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. महासंघाने व्यवसाय वाढविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघ हा पणन महासंघाचा घटक असल्याने महासंघाने राज्य शासन आणि खरेदी विक्री संघ यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे.

Updated on 17 April, 2025 3:25 PM IST

मुंबई : शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची मोठी जबाबदारी आहे. आपले महत्त्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक (प्रशासन) आनंद ऐनवाड, सरव्यवस्थापक (मालमत्ता) नितीन यादव, सरव्यवस्थापक (खरेदी) देविदास भोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, महासंघाची स्थापना १९५८ मध्ये झालेली असून महासंघाच्या उद्दिष्टांमध्ये काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. महासंघाने व्यवसाय वाढविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघ हा पणन महासंघाचा घटक असल्याने महासंघाने राज्य शासन आणि खरेदी विक्री संघ यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे. यासाठी खरेदी विक्री संघाला एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये विश्वास जागवावा.

ज्या राज्यांमध्ये पणन महासंघाचे काम चांगले आहे त्या राज्यांच्या कामाचा अभ्यास करण्याची सूचना करून मंत्री श्री. रावल यांनी आपल्या राज्यातील शेतीमालाची विक्री होण्यासाठी इतर राज्यांना येथे निमंत्रित केले जाईल असे सांगितले. ते म्हणाले, पणन महासंघ आणि तालुका पातळीवरील खरेदी विक्री संघामार्फत जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी होईल यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या योजनांमधून व्यवसाय मिळविता येईल का त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

महासंघाच्या मालमत्ता सुस्थितीत ठेवून शक्य त्या ठिकाणी त्या भाडेतत्वावर द्याव्यात, आठवडी बाजारांसाठी जागा मिळवून देण्यात महासंघाने समन्वयकाची भूमिका बजावावी, याद्वारे महासंघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मालमत्तांचा सुयोग्य वापर होण्यासाठी पणन महामंडळ आणि वखार महामंडळाचे सहकार्य घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक श्री. डुबे पाटील यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पणन महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघाकडील ५११ पदांपैकी केवळ १०४ पदे कार्यरत असून इतर पदांची भरती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या गोदामांची तसेच इतर मालमत्तांची दुरुस्ती होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात या वर्षी सोयाबीनची सर्वाधिक खरेदी झाली असून देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. यामध्ये राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी महासंघाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले.

English Summary: State Cooperative Marketing Federation to adopt professional attitude for procurement of agricultural produce Marketing Minister Jayakumar Rawal
Published on: 17 April 2025, 03:25 IST