1. बातम्या

State Bank Of India : गृहकर्जदारांना मोठा दिलासा; कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षाची अधिकची मुदत

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, स्टेट बँकेने मात्र आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

“करोनाचा फटका बसलेल्या व्यक्तीची नोकरी किंवा त्याचा रोजगार पुन्हा केव्हा सुरू याचा विचार करून त्यावर कर्जाच्या पुनर्रचनेचा कालावधी ठरवण्यात येईल,” असे शेट्टी यांनी नमूद केले. १ मार्च २०२० पूर्वी ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे, त्यांनाच या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीला किती कालावधी देण्यात येईल यावर निर्णय घेतला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना ६ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो.

ही सुविधा कोणत्या ग्राहकाला ६ महिन्यांसाठी मिळेल आणि कोणाला २ वर्षांसाठी हे सर्व बाबी पडताळल्यानंतरच समजणार आहे. जून महिन्यातील आकडेवारीनुसार बँकेकडून आतापर्यंत १० टक्के लोकांनी मोराटोरिअम सुविधेचा लाभ घेतला आहे. बहुतांश ग्राहक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी अर्ज करणार नाहीत, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.स्टेट बँक कर्जाच्या पुनर्रचनेत पुढे असली तरी येत्या काळात आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसारख्या बँकांकडूनही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंतही या बँका अशी योजना आणू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांना कर्जाची पुनर्रचना समजावण्यासाठी बँकेने ऑनलाइन पोर्टलही लाँच केले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters