राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पीकपद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत केलेला बदल फायदेशीर ठरत आहे तर काही शेतकऱ्यांना या बदलामुळे कुठलाच फायदा होतांना बघायला मिळत नाही. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने खानदेशातील आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच नाविन्यपूर्ण शेती करण्यास ओळखले जातात. जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या वालंबा शिवारातील जवळपास 50 हून अधिक शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत उत्पादनवाढीच्या अनुषंगाने स्ट्रॉबेरीची लागवड केली.
या 50 हून अधिक शेतकऱ्यांत सर्वात जास्त तरुणाई वर्गाचा समावेश असल्याने तरुण पिढी देखील शेतीकडे सकारात्मक दृष्टीतून बघत असल्याचे निदर्शनास आले. शिवारातील स्ट्रॉबेरी लागवड सध्या दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळवून देत आहे. मात्र असे असले तरी, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील वालंबा शिवार अतिशय दुर्गम आहे. डोंगर दरीवर वसलेल्या या शिवारात अद्यापही मार्केटची तसेच वाहतुकीची व्यवस्थित व्यवस्था बघायला मिळत नाही. यामुळे या शिवारातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीसाठी नाना प्रकारचे अडथळे येत असल्याचे समजत आहे, विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीमुळे मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या स्ट्रॉबेरीला अगदी कवडीमोल दरात स्ट्रॉबेरी विकण्याची या शेतकऱ्यांवर नामुष्की ओढावली आहे. जिल्ह्यातील तोरणमाळ वालंबा या शिवारात स्ट्रॉबेरी लागवडीची सुरुवात जवळपास 14 वर्षांपूर्वी झाली. मात्र असे असले तरी अद्यापही या शिवारातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
तोरणमाळ शिवारात स्ट्रॉबेरीची लागवड एवढी बघायला मिळत नाही मात्र वालंबा आणि दाब शिवारात 50 हून अधिक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. नंदुरबार जिल्हा मागासलेला आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र असे असले तरी वालंबा शिवारातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत यशस्वीपणे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यास गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवात केली आहे. शिवारातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी कृषी विभागाचे अनमोल सहकार्य लाभले असल्याचे देखील येथील शेतकरी नमूद करतात. या शिवारातील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड करून आपले जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. शिवारातील अजून अनेक शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी इच्छुक आहेत आणि भविष्यात या भागात नव्हे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे मळे बघायला मिळणार एवढे नक्की.
सध्या शिवारातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीचा योग्य तर्हेने वापर करून दर्जेदार उत्पादन प्राप्त करीत आहेत या कामी त्यांना कृषी विभागाचे अनमोल सहकार्य लाभत आहे. मात्र असे असले तरी दुर्गम भाग असल्याकारणाने येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मार्केट ची उपलब्धता नाही. परिणामी येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची रस्त्यावरच विक्री करावी लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून स्ट्रॉबेरी काढणीसाठी सुरुवात झाली असून सध्या येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी सोन्यासारखा माल रस्त्यावर विक्री करण्यासाठी मजबूर आहेत.
Published on: 08 February 2022, 09:30 IST