News

सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत. अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी.

Updated on 04 April, 2025 12:16 PM IST
AddThis Website Tools

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,  यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत. अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमातून महामंडळाला 22-24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न 100 कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.त्यासाठी एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमतून राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंडाची अट समाविष्ट करावी.

भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करा

सध्या 5150 इलेक्ट्रिक बस पैकी केवळ 220 बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा करणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यांचा करार रद्द  करण्याची कार्यवाही करावी.

नवीन बसेस प्रत्येक आगाराला पोहोचल्या पाहिजेत

यंदा 2 हजार 640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी मार्च अखेर 800 बसेस 100 आगारात दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व 251 आगारांना नवीन बसेस मिळतील असे नियोजन करावे. महामंडळाच्या नवीन बसेसचे लोकांनी चांगले स्वागत केले आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसेसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात यावेत, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

English Summary: ST advertisement rates will increase Order to the administration to increase the income of the transport minister
Published on: 04 April 2025, 12:16 IST