कृषि संशोधन व पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी संशोधन कार्य वृध्दींगत व्हावे याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती यांच्यात बारामती येथे दि. 17 जानेवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण होते तर सामंजस्य करारावर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी बदलत्या हवामान परिस्थित शाश्वत उत्पादन देणाऱ्या विविध पिकांच्या वाणाचा विकास करणे आवश्यक असुन राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेशी झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील अद्यावत ज्ञानाने संशोधन कार्यास गती प्राप्त होईल. या संस्थेतील शास्त्रज्ञांनी परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजीत करण्यात येऊन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे ज्ञान वृध्दींगत होण्यास मदत होईल. बारामती येथील शास्त्रज्ञांनी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या तासिका घेवुन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शनात डॉ. वासकर यांनी कृषि विद्यापीठाच्या संशोधन कार्यावर प्रकाश टाकला तर डॉ. जगदीश राणे यांनी शास्त्रज्ञांना या सामंजस्य कराराचे महत्व विषद करून भविष्यात या सामंजस्य करारामुळे उत्कृष्ट प्रतीचे ताण सहन करणाऱ्या विविध पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत व्यक्त केले. सदरिल सामंजस्य करार पुढील 5 वर्ष कालावधीसाठी राहणार असुन करारामुळे कृषि संशोधनास नवीन चालना मिळणार असुन दर्जात्मक संशोधन कार्यास मदत होणार आहे. बदलत्या हवामानात कमी वअधिक तापमान, पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने कापूस, सोयाबीन, कडधान्य (तूर, हरभरा, मूग, आणि उडीद), गळीतधान्य (सुर्यफुल, भुईमुग व जवस), ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या वाणांचे विविध प्रकारच्या चाचण्या व अभ्यास राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथे भविष्यात करण्यात येईल.
तसेच परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी संशोधन कार्य राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत करु शकतील. करारामुळे दोन्ही संस्था मार्फत भविष्यात नवोंमेषी संशोधन प्रकल्प केंद्र शासनास आर्थिक साहाय्यासाठी सादर करण्यात येतील. त्याद्वारे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान विकसीत होण्यास मदत होईल. सद्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत मोठया प्रमाणात संशोधन सहयोगी व वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत, ही विशेष बाब आहे. कार्यक्रमास उपसंचालक संशोधन डॉ. अशोक जाधव, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके आदीसह राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे शास्त्रज्ञ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Published on: 25 January 2020, 08:28 IST