News

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला दमदार दर मिळाला आहे. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने काढणीला सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पण बाजारात आलेल्या सोयाबीनला वाशीममध्ये या हंगामातील ४ हजार ३११ रुपयांचा दर मिळाला आहे.

Updated on 13 October, 2020 12:28 PM IST


वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला दमदार दर मिळाला आहे. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने काढणीला सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पण बाजारात आलेल्या सोयाबीनला वाशीममध्ये या हंगामातील ४३११ रुपयांचा दर सोमवारी मिळाला आहे. वाशीम बाजारात सुमारे चार हजार पोत्यांची आवक झाली होती. याविषयीची माहिती अॅग्रोवनने दिली आहे. या हंगामातील नवीन सोयाबीनची काढणी सुरु असून बाजारपेठेत विक्रीसाठी आवक वाढू लागली आहे.

वाशीम जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर मानला जातो. या जिल्ह्यातील दर्जेदार सोयाबीन बियाण्यासाठी अधिक प्रमाणात वापरले जाते. मागील दोन हंगामापासून सोयाबीन काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावत नुकसान केले. यंदाही सध्या अशीच स्थिती आहे. सलग पावसामुळे अनेकांचे सोयाबीन सोंगणी होऊनही त्याची सुडी शेतातच पडून आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पावासाच्या तडाख्यातून सुटला आहे, तो माल बाजारात भाव खाऊ लागला आहे. पण येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर अजून वाढू शकतात अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पाऊस झाल्यामुळे सोयाबीन सुडी पावसात भिजली आहे. यामुळे सोयाबीनच्या दर्जाला फटका बसू शकतो.

दरम्यान काही दिवसात तुरीच्या दरात तेजी आली आहे, त्यापाठोपाठ सोयाबीनमध्येही तेजीचे दिवस तयार होत आहेत. प्रामुख्याने या हंगामात तयार झालेले व पावसापासून वाचलेले सोयाबीन बियाणे म्हणून वापरण्यासाठी खरेदी केले जात आहे. सोमवारी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या सोयाबीनला वाढीव भाव मिळाला आहे. सुमारे दोनशे क्किंटल सोयाबीनला हा दर मिळाला आहे. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरसरी ३ हजार ६५० रुपयांचा भाव मिळाला. कमीत कमी ३ हजार ३०० व जास्तीत जास्त ३ हजार ८२५ रुपये दराने सोयाबीन विकले. अकोल्यातील बाजार समितीत सोमवारी ६ हजार ८७९ पोत्यांची आवक झाली होती.

English Summary: Soybeans fetched a price of Rs 4,000 in washim
Published on: 13 October 2020, 12:27 IST