नांदेड : खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तीस किलोच्या बॅगला ३३०० ते ३६०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे महामंडळाच्या सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रणात असले तरी बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी अपेक्षीत आहे. यासाठी तीन लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. या बियाण्याचा खासगी तसेच सार्वजनिक यंत्रणेकडून पुरवठा करण्यात येतो. यंदा कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे राखीव ठेवण्याचे आवाहन केले होते. तसेच काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात बीजोत्पादनही घेतले. असे असले तरी मागणी अधिक आहे. त्यामुळे बाजारात अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बाजारात आले आहे.
काही नावाजलेल्या बियाणे कंपन्यांनी बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याचा फायदा घेऊन दर १०० ते १३० रुपये प्रतिकिलो प्रमाणे ठोक विक्रेत्यांना देण्याचे ठरविले, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे सरळ वाणाच्या सोयाबीन बॅगचे दर तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपयावर पोचले आहेत.
नफेखोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
यंदा सोयाबीन बाजारात आले, तेव्हा चार हजार ते साडेचार हजार रुपये दर होते. या दराच्या २० ते २५ टक्के अधिकचा दर बियाणे उत्पादकांना दिला जातो. यामुळे पाच ते साडेपाच हजार रुपये दराने खरेदी केलेले सोयाबीन खासगी कंपन्या दहा हजार ते १३ हजार रुपये दराने बियाण्याच्या माध्यमातून विक्री करत आहेत.
परंतु बियाणे महामंडळाचे दर प्रतिकिलो ७५ रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याने ते नियंत्रणात आहेत. परंतु यंदा मागणीच्या केवळ ३० टक्केच बियाणे उपलब्ध झाले आहे.
Published on: 04 June 2021, 04:10 IST