1. बातम्या

सोयाबीन उत्पादकांची सुगी; हंगामात ६ हजार रुपयांचा दर

सोयाबीनचे दर तेजीत

सोयाबीनचे दर तेजीत

देशात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. नवे सोयाबीन येण्याला आणखी सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या काळात मागणी वाढून दरात आणखी तेजी येईल. हंगामात दर सहा हजारांचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता आहे. दरात १५० ते २०० रुपयांचा चढ-उतार गृहीत धरल्यास सोयाबीनची तेजी कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

‘सीबॉट’ या आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोयाबीन सध्या तेजीत आहे. `सीबॉट’वरील तेजीने भारतीय सोयाबीनच्या दरवाढीला आधार मिळत आहे. ‘सीबॉट’वर सोयाबीनचे दर हे १४२५ डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आले आहेत. हे दर १४४५ डॉलरच्या पातळीवर पोचले तर सोयाबीनमध्ये आणखी तेजी येण्याची संकेत आहेत.

देशातील शेतकऱ्यांनी बहुतांश सोयाबीन बाजारात विकले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवले आणि ज्यांना पैशांची निकड आहे, असेच शेतकरी सध्या बाजारात विक्री करत आहेत. मात्र बाजारातील तेजी पाहून अद्यापही अनेक शेतकरी विक्रीसाठी थांबले आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक नगण्य आहे. त्यामुळे दरात तेजी आली आहे. तसेच देशातील नव्या पिकाची आवक ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२१ पर्यंत होणार नाही. म्हणजेच आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागेल. या काळात देशात सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवेल हे निश्‍चित आहे.देशात काही बाजारांत सोयाबीनचे दर हे १५० ते २०० रुपयांनी तुटले होते. मात्र एकूण परिस्थिती बघता सोयाबीनच्या दरात वाढीचीच शक्यता अधिक आहे. सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने दर हंगामात सहा हजार रुपयांपर्यंतही पोहचू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

 

ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले जात आहे. येथे जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांनी याला पुष्टी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रतिकूल वातावरणाचा परिणाम पिकावर होत असून अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या पिकाच्या काढणीलाही उशीर होत आहे. ब्राझीलमधील पराना आणि रियो ग्रॅंड या दोन प्रांतात जास्त प्रादुर्भाव असल्याचे वृत्त आहे तर महत्वाच्या माटो ग्रासो प्रांतात त्यातुलनेत कमी प्रादुर्भाव आहे. सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत ब्राझील अग्रेसर देश आहे. यंदा ब्राझीलमध्ये विक्रमी १३५१ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे. तर ‘युएसडीए’ने १३४० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नेपाळमधून भारतात सोयाबीन तेलाची आयात वाढत आहे. सुरुवातीच्या काळात नेपाळमधून पाम तेलाची निर्यात जास्त होती. मात्र आता सोयाबीन तेलाची निर्यात वाढली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे नेपाळमध्ये ना पाम तेलाचे उत्पादन होते ना मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे. मग सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ कसे दिले जाते असा प्रश्‍न उपस्थित करत याची पडताळणी करावी, असे भारत सरकारने नेपाळ सरकारला सांगितले आहे. चालू वित्तीय वर्षात आठ महिन्यांत नेपाळने १.५१ लाख टन सोयातेल निर्यात केली. तर अर्जेंटिना, ब्राझिल, पेरुग्वे आणि टर्की या देशांतून २४००.०२ कोटी नेपाळी रुपयांचे कच्चे सोयातेल आयात केले होते.

राज्यनिहाय प्लॅंटचे

सरासरी दर (रुपये/क्विंटल)

मध्य प्रदेश – ५६०० ते ५८००

महाराष्ट्र – ५६०० ते ५८५०

राजस्थान – ५४०० ते ५७००

गुजरात – ५००० ते ५२००

 

राज्यातील प्लॅंटचे

सरासरी दर (रुपये/क्विंटल)

सोलापूर – ५८५०

हिंगोली – ५८००

लातूर – ५७००

अकोला – ५६५०

 

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters