आतापर्यंत कांदा हेच एक मात्र बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले जात असे मात्र कांदा समवेतच आता सोयाबीन देखील बेभरवशाचा ठरू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून टॉप गीअरमध्ये सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होत होती, सोयाबीनचे बाजार भाव सुधारण्यासाठी तब्बल एक आठवड्याचा काळ लागला मात्र, आठवड्याभरात सुधारलेले सोयाबीनचे बाजार भाव एका रात्रीतूनच धडामकन खाली आलेत. सोयाबीनचे बाजार भाव आता अर्शवरून फर्शवर आले आहेत. गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत होती, सोयाबीनचे दर लातूर एपीएमसीमध्ये 7,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचले होते मात्र आता याच एपीएमसीमध्ये सोयाबीनचे दर 6 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल वर येऊन ठेपले आहेत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनचे बाजार भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतील अशी आशा होती मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे आणि सोयाबीनच्या दरात जवळपास पाचशे रुपयाची भली मोठी कपात नमूद करण्यात आली आहे. एका रात्रीतच असा कुठला खेला झाला ज्यामुळे सोयाबीनचे दर तब्बल अर्ध्या हजाराने कमी झाले, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. बाजारपेठेत तयार झालेल्या या नवीन समीकरणामुळे आता सोयाबीनची विक्री करायची की सोयाबीनची साठवणूक करायची याबाबत शेतकरी मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीनला मात्र 6300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता, तेव्हा मिळत असलेला दर हा शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नव्हता मात्र सरासरीपेक्षा अधिक असल्याने लातूर एपीएमसीमध्ये रोजाना बारा हजार पोत्यांची आवक नमूद करण्यात येत होती. 17 फेब्रुवारी नंतर बाजारपेठेत मोठा अमुलाग्र बदल झाला आणि सोयाबीनच्या दराने पुन्हा एकदा मुसंडी मारण्यास सुरुवात केली.
25 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचे दर सात हजार 300 च्या घरात आले होते म्हणजे दहा दिवसाचा सोयाबीनचे दर एक हजार रुपयांनी वाढले, गेल्या आठवड्यापासून विशेषता मागील तीन दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीनचे दर याच पद्धतीने वाढत राहतील असा तज्ञांचा अंदाज होता मात्र, सोयाबीनच्या दरात आता अचानक घट झाली आहे. सोयाबीनच्या बाजार भावात एक हजार रुपयांनी वाढ होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आणि सोयाबीनच्या दरात 400 रुपयांनी घट होण्यासाठी मात्र एका रात्रीचा कालावधी लागला.
गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात रोजाना शंभर रुपयांची वाढ होत होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजून भाव वाढतील या आशेने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली. असे असले तरी, काही मोजक्या शेतकऱ्यांनी जे मिळत आहे ते पदरात पाडावे या हेतूने मागील आठवड्यात सोयाबीनची विक्री केली त्यामुळे ठेवून पश्चात्ताप करण्यापेक्षा खाऊन पश्चाताप करणाऱ्यांचा फायदा झाला असल्याचे बघायला मिळत आहे.
एका रात्रीतून सोयाबीनचे बाजारपेठेतील जे चित्र बदलले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आता पुढे काय करावे हे सुचत नाहीय. बाजारपेठेतील चित्र बघता आता अनेक तज्ञ शेतकरी बांधवांना सावध पवित्रा उचलत टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे तोटा झाला तर अल्पप्रमाणात होईल आणि फायदा झाला तरी देखील त्याचा लाभ घेता येईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.
Published on: 27 February 2022, 09:52 IST