Akola News : सोयाबीनला भाव मिळत नसल्याने आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हातात हत्यार घेतलं आहे. अकोला जिल्ह्यातील एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने दराअभावी हातात हत्यार घेतल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे.
सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत. पण सरकारकडून उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसून सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, असंही रविकांत तुपकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे, अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील रवी महानकर या शेतकऱ्याने सोयाबीनला कमीतकमी रु.६००० प्रतिक्विंटल भाव मिळावा म्हणून हत्यार हाती घेतले. सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी गेले अनेक महिने हजारो शेतकरी बांधवांनी सरकारकडे मागणी केली. शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. गरज पडल्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलने केली पण गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसले. तुमच्या याच नाकर्तेपणामुळे त्रस्त शेतकऱ्यांवर हत्यारे घेऊन रस्त्यात उतरण्याची वेळ आलेली आहे. आज फक्त एक उतरलाय, असेच निर्दयी राहिलात तर सगळेच उतरतील आणि तुमची मस्ती कायमची जिरवतील.
मागील काही दिवसांपासून सोयाबीन दराचा प्रश्न राज्यात पेटला आहे. यावर शेतकरी नेत्यांकडून आंदोलन करण्यात आली. अनेक संघटनांनी सरकारला निवेदन दिले तरी देखील सोयाबीनच्या दराबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सोयाबीनला केंद्र सरकारने चालू हंगामात अर्थात २०२३-२४ साठी ४ हजार ६०० रुपये किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली आहे. तर मागील वर्षी सोयाबीनची किंमत ४ हजार ३०० रुपये होती. चालू वर्षात फक्त ३०० रुपये यात वाढ करण्यात आली आहे. तर सोयाबीन उत्पादकांकडून ६ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी केली जात आहे.
Published on: 06 January 2024, 03:05 IST