प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये चालू हंगामात सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. यावर्षी ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात ७ लाख ६० हजार टन इतकी घट अपेक्षीत असल्याचा अंदाज तेथील सरकारी कृषी कंपनी कॉनॅबने वर्तवला आहे. जानेवारीच्या अंदाजानुसार ब्राझीलमधील अपेक्षीत सोयाबीन उत्पादन १३ कोटी ३७ लाख टन इतके आहे, तर मागील महिन्यातील अंदाजानुसार, ते १३ कोटी ४४ लाख टन इतके होते, असे असले तरी लागवड क्षेत्रात मात्र वाढ अपेक्षित आहे.
हेही वाचा : सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण
२०२०-२१ च्या हंगामात ब्राझीलमधील सोयाबीनचे लागवड क्षेत्र जवळपास ३८२ लाख हेक्टर इतके होण्याचा अंदाज असून त्यात १७ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. उत्पादकतेत घट झाली असल्याने लागवड क्षेत्रात वाढ होऊन सुद्धा उत्पादनात घट होणार आहे. उत्पादनात घट होणार असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सात टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ब्राझीलने सोयाबीन निर्यातीत तब्बल ३४ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून ७५० लाख टन सोयाबीन परदेशात रवाना झाले होते. एकूण निर्यातीपैकी ७३ टक्के निर्यात चीनला झाली होती.
तसेच अमेरिकेचे कृषी खाते अर्थात यूएसडीएने ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन १३ कोटी १५ लाख टन इतके होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा ला नीना च्या प्रभावामुळे ब्राझीलमध्ये कोरडे हवामान असल्याने सोयाबीन लागवडीला सहा आठवड्यांनी उशीर झाला होता, त्यामुळे काढणीलाही उशीर होणार आहे. चीनने मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडून सोयाबीन खरेदी केले आहे. त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन साठे आजवरच्या निचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार, कोरोनाची दुसरी लाट आली असूनही जागतीक पातळीवर मांसापासून निर्मित पदार्थांची मागणी कमी ोताना दिसत नाही. त्यामुळे सोयाबीनची मागणीही राहील. गाळप झाल्यानंतर सोयाबीनची पेंड पशुखाद्य म्हणून वापरण्यात येते. दरम्यान अमेरिकेतही यंदा सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
अमेरिका, ब्राझील, आणि अर्जेंटिना हे सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक देश आहेत. ला निनामुळे या तीनही देशांमधील सोयाबीन उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या जागतिक किमती विक्रमी पातळीवर आहेत. त्याचा फायदा भारतीय सोयाबीन उत्पाद शेतकऱ्यांना झाला आहे.
Published on: 25 January 2021, 05:00 IST