सोयाबीनच्या मुहूर्ताचा दर जरी कायम राहिलेला नसला तरी दराची फारशी चिंता न करता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधलेले आहे. पाडव्याच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होती. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा करत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही केली. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोयाबीनच्या दरातील चढ-उतारामुळे बाजारात नेमकी आवक काय राहणार हे अद्यापही सांगता येत नाही. मध्यंतरी सोयाबीनचे दर घसरले तेव्हा केवळ 8 हजार पोत्यांची आवक होत होती. शुक्रवारी मात्र, 40 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांची दिवाळी ही गोड झाली आहे. बाजारपेठेत नवचैतन्य पाहवयास मिळाले.
दिवाळीच्या अनुशंगाने रविवारपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. पाडव्याच्या दिवशी व्यवहार होतात हे शेतकऱ्यांना माहीत होते. त्यामुळेच शुक्रवारी पाडव्याच्या दिवशीही तब्बल 40 हजार पोत्यांची आवक झाली होती. सलग सहा दिवस बाजार समिती बंद असल्याचाही हा परिणाम आहे. मात्र, सोयाबीनचे दर काहीही असोत शेतकरी विक्रीसाठी किती सजग झाला आहे हे शुक्रवारच्या आवकवरुन समोर आले आहे.
हेही वाचा : सोयाबीन कुटारापासून बनवा कंपोस्ट खत, जमिनीला होईल लाखमोलाचा फायदा
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या कडधान्य साठा मर्यादेच्या निर्णयाची मुदत ही संपलेली आहे. त्यामुळे कदाचित व्यापाऱ्यांनी साठवणूकीला सुरवात केलेली आहे. त्यामुळेच दर हे स्थिर आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. किमान दरात घसरण नाही हीच मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे बाजारातील दराचा अंदाज नसतानाही लातूरसह उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, सोलापूर, कर्नाटक येथून सोयाबीनची आवक झाली होती.
शुक्रवारी पाडव्यानिमित्त येथील बाजार समिती ही सुरू होती. त्यामुळे सोयाबीनची विक्रमी आवक तर झालीच पण एकप्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, आज (शनिवारी) बाजार समितीमधील व्यवहार हे भाऊबीजमुळे बंद राहणार आहेत. सोमवारपासून नियमित व्यवहार होतील असे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे.
Published on: 06 November 2021, 10:13 IST