यंदा विदर्भासह मध्य प्रदेशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सोयाबीनचे दर चार हजार रूपये प्रति क्विंटल इतके होते.
तेच आता सात हजार रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, सोयाबीनचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या दरांवरही झाला आहे.महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन विदर्भात होते. पण निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा विदर्भात सोयाबीनचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. शिवाय मध्य प्रदेश आणि ठिकाणीही सोयाबीनचे उत्पादन कमीच झाले आहे. बाजारात सोयाबीन तेलासाठी सोयाबीनची मागणी प्रचंड आहे. पण त्या प्रमाणात उत्पादनच न झाल्याने सोयाबीनचे दर सतत वाढत आहेत.
ऑक्टोंबर महिन्यात ३५०० ते ४ हजार रूपये प्रतिक्विंटल असलेल्या सोयाबीनच्या दरात डिसेंबरनंतर बऱ्यापैकी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून उत्पादन घटल्याचा अंदाज आल्यानंतर बाजारात सोयाबीनची मागणी वाढली.
अनेक व्यापाऱ्यांनी साठा करण्यासाठी सोयाबीनच्या खरेदीवर भर दिला आहे. परिणामी कृत्रिम टंचाई निर्माण झालेली आहे. गेल्या महिन्याभरात सोयाबीनचे दर ६ हजार रूपयांवरून ७ हजार रूपयांवर गेले आहेत. त्यात आणखी वाढ हाेईल, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून लावला जात आहे.
Published on: 17 April 2021, 11:27 IST