या हंगामात सोयाबीन च्या दारात दररोज मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असताना बघायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला विक्रमी बाजार भाव मिळाला त्यानंतर शासनाच्या सोयापेंड आयातीच्या मंजुरीमुळे गगन भरारी घेणारे सोयाबीनचे दर एका क्षणात जमिनीवर आले. त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शहाणपणा मुळे मध्यंतरी सोयाबीनचे दर समाधानकारक मिळत असल्याचे चित्र नजरेस पडले. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आणि परत एकदा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नमूद करण्यात आली. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात आणि पहिल्याच आठवड्यात सोयाबीन ला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र होते मात्र महिनाअखेर येत येत सोयाबीनच्या बाजारभावाला पुनश्च एकदा उतरती कळा लागली.
आता सोयाबीनला सव्वा सहा हजार प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत असून सोयाबीनचे बाजार भाव गेल्या काही दिवसापासून स्थिरावले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सोयाबीनच्या साठवणुकीवर जास्त भर दिला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही बाजार भावात वृद्धी होण्याची आशा आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी वाढीव दराची अपेक्षा बाळगणे हे मुळीच अयोग्य नाही, मात्र आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे आणि अजून काही दिवस सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याचे कुठलेच चित्र बाजारपेठेत नजरेस पडत नाही. शिवाय उन्हाळी सोयाबीनसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे त्यामुळे आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची आवक होणार असा अंदाज आहे.
त्यामुळे जेव्हा उन्हाळी सोयाबीन बाजारात येईल तेव्हा जुन्या सोयाबीनला कमी दर प्राप्त होतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारपेठेतील सध्याचे चित्र बघता आणि आगामी काळात उन्हाळी सोयाबीनची आवक लक्षात घेता शेतकरी बंधूंनी टप्प्याटप्प्याने का होईना सोयाबीनची विक्री करावी असा सल्ला दिला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मात्र दीड हजार पोत्यांची सोयाबीनची आवक येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दराची आशा आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या दहा दिवसापासून सोयाबीनला सव्वा सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर प्राप्त होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, या हंगामात बाजारपेठेचे चित्र बघता सोयाबीनच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मिळत असलेला दर हा समाधानकारक असल्याने विक्री वरती जास्त भर देणे गरजेचे आहे. आलेल्या संधीचे सोने करून घ्या नाही तर भविष्यात "तेलही जाईल तूपही जाईल आणि हाती धुपाटण येईल" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
Published on: 26 January 2022, 05:23 IST