खरीप हंगामातील सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीला उच्चांकी बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी केंद्रशासनाने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या साठवणुकीच्या धाडसी निर्णयामुळे सोयाबीनच्या बाजार भावात पुन्हा एकदा बढती झाली होती आणि बराच काळ सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळत होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला देखील सोयाबीनला समाधान कारक बाजार भाव मिळत होता.
मात्र जानेवारी महिना संपत संपत सोयाबीनच्या बाजार भावात उतरती कळा बघायला मिळत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दोन दिवसात सोयाबीन सहा हजार रुपय प्रति क्विंटलच्या खाली आला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नववर्षाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात भाव वाढ अपेक्षित होती मात्र सोयाबीनचे भाव वाढण्याऐवजी महिनाअखेरपर्यंत कमालीचे घसरले आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कमी झाले होते. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला. अनेक ठिकाणी सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता मध्यंतरी सोयाबीनच्या दरात थोडीशी घसरण झाली तरीदेखील सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा अधिक होते. देशांतर्गत बराच काळ सोयाबीनचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावले होते. हा मिळत असलेला बाजार भाव अपेक्षा सारखा नसला तरी समाधानकारक असल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले होते.
अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती त्यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनचे वजन कमी होत असल्याचे सांगितले जात आहे तसेच साठवणूक केलेल्या सोयाबीनचा दर्जादेखील खालावला असल्याचे नजरेस पडले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्च पर्यंत भाव वाढ होण्याचा अंदाज होता मात्र मार्चच्या आधीच सोयाबीनचे दर लक्षणीय कमी झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर प्राप्त होत आहे. सोयाबीनच्या भावात झालेली घसरण बघता ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे त्या शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तसेच साठवणूक केलेल्या सोयाबीनचा दर्जा खालावत असून वजनही कमी होत असल्याने अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कमी दरात सोयाबीन विक्री करण्याला पसंती दर्शवली असल्याचे चित्र हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळत आहे.
एकंदरीत परिस्थीती बघता दरवाढीच्या आशेने साठवलेला सोयाबीन मोठ्या संकटात असून आता शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला बाजारपेठेतील गणित ओळखुन जेव्हा दर वाढला तेव्हाच विक्री करायचं असं ठरवलं होत मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असता आणि आगामी काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव वाढणार नसल्याचे चित्र बघता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाईलाजाने सोयाबीनची कमी दरात विक्री सुरू केली आहे त्यामुळे सोयाबीनला कमी दर प्राप्त होत असताना देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला प्राधान्य दिले आहे.
Published on: 01 February 2022, 03:42 IST