यावर्षी सोयाबीनचे दर ठरवण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी किंग मेकर च्या भूमिकेत अवतरला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने बाजारपेठेतील गणित अचुक समजुन घेतले आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचा मोठा फायदा देखील झाला. जेव्हा बाजारपेठेत सोयाबीनला अत्यल्प बाजार भाव प्राप्त होत होता तेव्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्याऐवजी सोयाबीनची साठवणूक केली, आणि त्यामुळे बाजारपेठेत मागणीप्रमाणे पुरवठा उपलब्ध झाला नाही आणि म्हणून सोयाबीनचे दर वाढत राहिले.
सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. मागच्या आठवड्यात मिळत असलेल्या दरापेक्षा पाचशे रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले आहेत. म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पहिला फंडा पुन्हा एकदा अमलात आणला आणि त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे नजरेस पडत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर सात हजाराचा पल्ला गाठण्याची आशा आहे, त्यामुळे विक्री करण्याऐवजी शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास योग्य समजले आहे. मागील हंगामात सोयाबीन पिकाला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी कडे आपला मोर्चा वळवला. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यात कधी नव्हे ते सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
सोयाबीन पिकाच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता, हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या सोयाबीनला जवळपास नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर प्राप्त होत होता. मात्र मध्यंतरी केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीनच्या दरात कमालीची पडझड नमूद करण्यात आली होती. मात्र त्यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शहाणपण दाखवत, बाजारपेठेचे गणित आत्मसात करून. योग्य वेळी भंडारण करण्याचा निर्णय घेतला परिणामी बाजारपेठेत सोयाबीन चा मोठा तुटवडा भासला आणि परत एकदा सोयाबीनचे दर वाढायला सुरुवात झाली. मात्र आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनचे दर लक्षणीय डगमगताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी 6 हजार 700 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाणारा सोयाबीन सध्या 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल ते 6 हजार 100 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याला प्राधान्य दिल्याचे चित्र औरंगाबाद जिल्ह्यात दिसत आहे. आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे तसेच आगामी काही दिवसात उन्हाळी सोयाबीन बाजारात दस्तक देणार आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय फलश्रुतीस येतो की नाही हे विशेष बघण्यासारखे असेल.
Published on: 22 January 2022, 10:01 IST