News

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन २०२३ पर्यंत ज्वारीचे विविध २५ वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे.राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे.

Updated on 06 October, 2023 6:08 PM IST
डॉ.आदिनाथ ताकटे
दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित  जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते.तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची असते.त्याकरिता योग्य ज्वारीच्या वाणांची उपलब्धता करणे अत्यंत आवश्यक आहे.या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जमिनीच्या खोलीनुसार, ज्वारीचे विविध वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची  क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन २०२३ पर्यंत ज्वारीचे विविध २५ वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे.राज्यात एकूण ४० टक्के क्षेत्रावर राहुरीच्या विकसित  वाणांची लागवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रात रब्बी ज्वारी खाली सन २०२०-२१  मध्ये १६.६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड  झाली होती. त्यामध्ये  २३ टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे,४८ टक्के मध्यम  तर २९ टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला १७.४ लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले.राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी  ४० टक्के क्षेत्र  महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विकसित वाणाखाली आहे. 
यामध्ये फुले रेवती खाली १५ टक्के, फुले वसुधा खाली १० टक्के ,फुले सुचित्रा १० टक्के ,फुले अनुराधा ५ टक्के  मालदांडी व इतर स्थानिक  वाणाखाली ६० टक्के क्षेत्र  महाराष्ट्रात आहे.महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जरी ज्वारीची लागवड ही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली असली तरी  राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमी पासून पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी १५ सप्टेंबर नंतर पेरणीला सुरुवात करतात.तर काही शेतकरी हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर पेरणी करतात. विविध भागातील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्या नुसार पेरणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी ज्वारीच्या वाणांची निवड ही अत्यंत महत्वाची.त्याकरिता प्रस्तुत लेखात कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी  जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीचे वाण व खत व्यवस्थापन याबाबत माहिती दिली आहे.
रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी,चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुधारित  वाणांची निवड करावी.हलकी जमिन(३० ते ४५ से.मी. खोल),मध्यम खोल जमिन(४५ ते ६० से.मी.खोल ) व भारी जमिन (६० से.मी. पेक्षा जास्त खोल)अशा जमिनीच्या खोलीनुसार रब्बी ज्वारीचे वाण निवडावेत.

मूलस्थानी जलसंधारण
*पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे उतारास आडवी करावीत.नागंरट झाल्यावर १० ते १२ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा धसकटे वेचून शेत साफ करावे.पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार करावेत. ( ३.६० चौ. मी. x ३.६० चौ. मी.आकाराचे) वाफे तयार करतांना सारा यंत्राने करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात.तसेच ट्रक्टर चलित यंत्राने एकावेळी (६ चौ. मी. x २.०० चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात.
*सदर वाफे रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहेतेंव्हा १५ सप्टेंबरपूर्वी, ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे तयार करावेत..पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल त्यामध्ये जिरवावा.पेरणीच्यावेळी वाफे मोडून पेरणी करावी व पुन्हा सारा यंत्राच्या सहाय्याने गहू ,हरभरा पिकांसारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यानंतर तो आडवून जिरवता येईल.या तंत्राला मूलस्थानी पाणी व्यवस्थापन असे म्हटले जाते.या तंत्रामुळे रब्बी ज्वारीचे ३० ते ३५ टक्के उत्पादनात वाढ होते.

ज्वारीची पेरणी आणि बीजप्रक्रिया
*कोरडवाहू रब्बीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी.शक्यतो हस्ताचा पाऊस पाडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे.योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादूर्भाव अधिक होतो.
*पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी.त्यासाठी १ किलो बियाण्यास ३०० मेष गंधकाची ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.त्यामुळे काणी हा रोग येत नाही.गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
*पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ से.मी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र चाड्यातून पेरावे.कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० से.मी ठेवावे.बागायती ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर १२-१५ से.मी. ठेवावे.

आंतरमशागत
*ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसात पीक ताणविरहित ठेवावे.पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी.
*पहिली पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी.दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी.त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो व तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी.त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीचे वाण व खत व्यवस्थापन
*रब्बी ज्वारीचे सुधारीत व संकरित वाण खतांना चांगला प्रतिसाद देतात.हलक्या जमिनीत(३० ते ४५ से.मी. खोल) फुले यशोमती,फुले अनुराधा, फुले माउली या वाणांचा वापर करावा.पेरणी करतेवेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र म्हणजेच ५५ किलो युरिया (सर्वसाधारणपणे एक युरियाची गोणी) दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.

जमिनीच्या खोलीनुसार कोरडवाहूआणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण :

१. हलकी जमिन( खोली ३० से.मी) - फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती
२. मध्यम जमिन(खोली ६० से.मी)- फुले सुचित्रा, फुले माऊली,परभणी मोती,मालदांडी ३५-१,
३. भारी जमिन(६० से.मी पेक्षा जास्त)- सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही२२, पी.कें.व्ही.क्रांती,
परभणीमोती,फुले पूर्वा संकरित वाण:सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९
४. बागायतीसाठी - फुले रेवती, फुले वसुधा,सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९
५. हुरड्यासाठी- फुले उत्तरा,फुले मधुर
६. लाह्यांसाठी - फुले पंचमी
७. पापडासाठी- फुले रोहिणी

*मध्यम जमिनीत (४५ ते ६० से.मी.खोल) फुले सुचित्रा,फुले माउली,मालदांडी ३५-१ या वाणांचा वापर करावा.पेरणी करताना प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद म्हणजेच ८७ किलो (सर्वसाधारणपणे दोन गोण्या) युरिया व १२५ किलो(सर्वसाधारणपणे अडीच गोणी) एसएसपी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
*भारी जमिनीत (६० से.मी.पेक्षा अधिक खोल )फुले वसुधा, फुले यशोधा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, सीएसएच १५, सीएसएच १९, या वाणांचा वापर करावा. पेरणी करतेवेळी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद म्हणजेच १३० किलो युरिया (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) व १८७ किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पावणे चार गोणी) दयावे.
*बागायती ज्वारीसाठी मध्यम व खोल जमिनीसाठी फुले वसुधा,फुले यशोधा,फुले रेवती, सीएसव्ही-१८,सीएसएच १५,सीएसएच १९ या वाणांचा वापर करावा. मध्यम जमिनीकरिता प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश म्हणजेच १७४ किलो युरिया (सर्वसाधारणपणे साडेतीन गोणी),२५० किलो एसएसपी(सर्वसाधारणपणे पाच गोणी) व ६७ किलो एमओपी(सर्वसाधारणपणे सव्वा गोणी) याप्रमाणे खते द्यावीत.
*बागायती ज्वारीच्या पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पहिली खुरपणी झाल्यावर साधारणपणे दयावे.भारी जमिनीत प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश दयावे.त्याकरिता २१७ किलो युरिया(सर्वसाधारणपणे सव्वाचार गोण्या),३०८ किलो एसएसपी(सर्वसाधारणपणे सहा गोणी) व ८४ किलो एमओपी (सर्वसाधारणपणे पावणे दोन गोणी) दयावे.पेरणी करतेवेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे.उर्वरित नत्र साधारणपणे पेरणीनंतर एक महिन्यांनी पहिली खुरपणी झाल्यावर दयावे.
*कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.

पाणी व्यवस्थापन
*कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना ५० ते ५५ दिवसांनी दयावे.
*दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे.
*बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना ९० ते ९५ दिवसांनी दयावे.
*भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ : पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असतांना : पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असतांना : पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ : पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी मो.९४०४०३२३८९

English Summary: Sorghum varieties according to soil depth Jowar update
Published on: 06 October 2023, 06:08 IST