News

माणगांव नगरपंचायत हद्दीत काळनदी परिसर पुनर्जीवन जिर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा नुकताच मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलजीवन, खरीप हंगाम यासंदर्भातील कामांचा आढावा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

Updated on 17 May, 2025 2:29 PM IST

मुंबई : माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेण्यात यावी. या परिसरात सुशोभीकरण पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

माणगांव नगरपंचायत हद्दीत काळनदी परिसर पुनर्जीवन जिर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा नुकताच मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलजीवन, खरीप हंगाम यासंदर्भातील कामांचा आढावा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, माणगांव नगरपंचायत क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. दलित वस्तीत लागू योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नगरपंचायत, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीचे बांधकाम, डागडुजीची कामे तात्काळ करण्यात यावी. या परिसरातील वनहक्क परिसरातील आदिवासींच्या मुलभूत गरजांसाठी स्वच्छतागृह, रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, विद्युत वाहिनी, दूरसंचार शाखा, शाळा बांधण्यासाठी परवानगी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठीचे बांधकाम करण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जलजीवन आराखड्यासंदर्भात श्रीवर्धन येथे पूर्ण झालेल्या ३४ कामांचा अहवाल तातडीने सादर करावा, जिथे जलस्त्रोत नाही तिथे ही कामे यशस्वी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याक्षेत्रात जलजीवनच्या पुढच्या टप्प्यात पाणी संवर्धनासाठी बंधाऱ्याची कामे प्रस्तावित करण्याच्या सूचना यावेळी मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगामातील माणगांव, रोहा, तळा, पाली येथील पिकांबाबत आढावा बैठक यावेळी घेण्यात आली. यावेळी जुन्या आंबा बागेमध्ये काळीमिरी आंतरपीक लागवड वाढवावी . तसेच महिलांचे क्लस्टर गट तयार करून कृषी पूरक उद्योग करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी माणगाव नगरपंचायत संदर्भात उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, नगरसेवक आनंद यादव, नितीन वाढवळ, रत्नाकर उभारे, लक्ष्मी जाधव, सागर मुंडे, सुमित काळे, मनोज पवार यांच्याबरोबर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

जलजीवन योजनेसंदर्भात कार्यकारी अभियंता संजय वेणर्तेकर, उपअभियंता प्रशांत म्हात्रे, एकनाथ कोठेकर तर खरीप हंगामातील पिकांसंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खडकाळे, शुभम बोऱ्हाडे, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

English Summary: Solve the urban problems of Mangaon city before monsoon Minister Aditi Tatkare instructions
Published on: 17 May 2025, 02:29 IST