News

मुंबई: ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली.

Updated on 28 February, 2020 7:43 AM IST


मुंबई:
ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. ग्रामविकास विभागाकडून नोव्हेंबर 2016 पासून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आता ‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ म्हणून राबविली जाईल.

माजी उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. तसेच त्यांनी  राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु करुन त्या प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर.आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील मंत्री किंवा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते केले जाईल, अशीही माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

English Summary: Smart village award scheme in the name of R. R. Patil
Published on: 28 February 2020, 07:41 IST