गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा भारतासारख्या कृषिप्रधान देशात सुलतानी व आसमानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशातील शेतकरी राजा पुरता बेजार झाल्याचे बघायला मिळत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. याचेच एक अजून उदाहरण समोर आले आहे ते विदर्भातील अकोला जिल्ह्यातून. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे येळवण शिवारातील एका शेतकऱ्याचा रब्बी हंगामात पेरणी केलेला हरभरा पूर्ण मातीमोल झाला. फळधारणा अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाचे फुले आणि घाटे गळून पडले आणि शेतात केवळ करपलेले हरभऱ्याचे रोपत बघायला मिळाले परिणामी या शेतकऱ्याने आपला सहा एकर क्षेत्रावर असलेला हरभरा वखरून टाकला. यामुळे हरभरा पेरणी साठी केलेला संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून हातातोंडाशी आलेले उत्पन्नदेखील निसर्गाच्या अवकृपेमुळे मिळाले नाही.
येळवन शिवारात नारायण पंढरी वजिरे यांची शेती आहे. खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामामध्ये तरी पदरी चार पैसे पडतील या आशेने नारायण यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रात हरभरा लागवड केली. हरभरा पीक पेरणी केल्यानंतर जोमात बहरले देखील, हरभरा पिकात फळधारणा चांगली झाली असल्याने नारायण यांना चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र त्यांच्या या आशेवर पाणी फेरले ते दोन जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने. दोन तारखेला झालेल्या अवकाळीने व गारपिटीने सोन्यासारखे हरभरा पीक मातीमोल झाले. गारपिटीमुळे हरभरा पिकाचे फुले आणि घाटे गळून पडले. रब्बी हंगामात पेरल्या गेलेल्या हरभरा पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होईल अशी चिन्हे दिसत असतानाच झालेल्या या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे नारायण यांचे मोठे नुकसान झाले, हरभऱ्याच्या पिकावर चे सर्व घाटे गळून पडल्याने नारायण यांच्यावर हरभरा पिकाला वखरण्याची नामुष्की ओढावली.
त्यामुळे लागवडीसाठी आलेला खर्च आणि येऊ घातलेले उत्पन्न पाण्यात गेले. नारायण यांना पेरणीसाठी व पीक जोपासण्यासाठी सुमारे 95 हजार रुपयांचा खर्च आल्याचे सांगितले गेले. मात्र अवकाळी नामक संकटामुळे सहा एकरावर पेरलेल्या हरभरा पिकाची राख झाली आणि त्यामुळे हरभरा पिकासाठी आलेला खर्च आणि येऊ घातलेले सहा लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न हिरावून घेतले गेले.
यासंदर्भात नारायण यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवली आहे व त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे. अद्याप नारायण यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, मात्र त्यांना शासनाकडून भरीव मदतीची आशा आहे.
Published on: 04 February 2022, 04:28 IST