काही वर्षांपूर्वी राज्यात डाळिंब क्षेत्रात अनेक शेतकरी अग्रेसर होते. यामध्ये अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळींबाची शेती करत होते. मात्र अलीकडच्या काळात यामध्ये मोठी घट झाली. अनेक रोग डाळींब शेतीवर आले यामुळे याचे क्षेत्र घटत गेले. यावर्षी राज्यात डाळिंबाची सरासरी एवढी लागवड झालेली नाही. यामुळे आता यामागची कारणे शोधणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड केली जाते मात्र यामध्ये आता लक्षणीय घट झाली आहे.
काही वर्षांपासूनचा बदलत्या वातावरणाचा परिणाम आता जावणू लागला असल्याचे अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले आहे. आता केवळ सरासरीच्या 5 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. बदलत्या वातावरणाबरोबर या फळबागांवर तेल्या, मर, कुजवा, आणि पीन होल बोअर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तसेच अतिवृष्टी अनियमित पाऊस यामुळे उत्पन्न घटले आहे. अशा दुहेरी संकटामुळेच शेतकरी डाळिंब लागवडीचे धाडस करीत नाही. लागवडीचा खर्च देखील मोठा आहे.
असे असताना परराज्यात पोषक वातावरण असल्याने गुजरात, राजस्थान या ठिकाणी क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम सध्या वावरात असलेल्या पिकांवर तर झालाच आहे पण आगामी हंगामावरही होत असल्याचेच यामधून दिसून येत आहे. यामुळे पैसे होणारे पीक शेतकरी घेत नाहीत. मर रोगावर अजूनही प्रभावी असे औषध आले नाही. यामुळे अचानक झाड जळून जात असल्याने त्याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना होत आहे. एकरी बघितले तर काही दिवसात झाडे जळाली तरी औषध आणि इतर खर्च तेवढाच लागत आहे. तसेच इतर पीक देखील त्यामध्ये घेता येत नाही, यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.
काळाच्या ओघात या शेती पध्दतीमध्ये बदलही होत आहे. देशात डाळिंबाचे सर्वाधिक म्हणजे 1 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. असे असताना यंदा यामध्ये कमालीची घट झाली आहे. वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होतो. यंदाच्या वर्षात याची प्रचिती शेतकऱ्यांना आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या बदलामुळे द्राक्ष, आंब्याचे उत्पादन तर घटणार आहेच पण हंगाम लांबणीवर पडल्याने योग्य दर मिळतो की नाही याची चिंता आता फलबागायतदार शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. यामध्ये पुढील पुढील काळात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे यावर ठोस अभ्यास होणे गरजेचे आहे.
Published on: 17 January 2022, 12:33 IST