आनंद ढोणे पाटील
परभणी: पूर्णा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या ऊसाचे बील आमडापूर येथील एल एल पी शुगर्स साखर कारखान्याने रखडविले आहे. गळीत हंगाम २०२४-२५ या चालू वर्षी पूर्णा तालुक्यातील शिवारातून जवळपास १ लाख टन ऊस श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सने गाळपासाठी नेला होता. त्यापैकी जानेवारी २०२५ या महिन्यात खरेदी केलेल्या ऊसाचे बील प्रती टन २५०० (अडीच हजार रुपये) संबंधित शेतकऱ्यांना अदा केल्याची माहिती कृषी मदतनीस पूर्णा विभाग नवनाथ क-हाळे यांनी दिली. मात्र फेब्रुवारी महिन्यात ऊसतोड करुन गाळपासाठी नेलेल्या ऊसाचे बील अद्याप देण्यात आले नाही.
पूर्णातील ज्या अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस दिला अशा जवळपास २५ हजार टन ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये अजूनही दिला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी या साखर कारखाना चालक मालका विरुद्ध बोंब ठोकत आहेत. शेतक-यांच्या ऊसाचे एकूण कोट्यवधी रुपये बील रखडवून आता हा श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स साखर कारखाना मुळमालकाने विक्रीस काढल्याची माहिती समोर आल्यामुळे संबंधित ऊस उत्पादक शेतकरी परेशान झालेत. त्यांना आपल्या ऊसाचे बील मिळते की नाही? असा प्रश्न पडला आहे.
सदर कारखान्याने आमची फसवणूक केल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. अनेकदा ज्यांचा ऊस नेला अशा शेतकऱ्यांनी कारखाना साईटवर जाऊन बिलाची मागणी केली परंतु आज देवू उद्या देवू म्हणून त्यांना भुलथापा देण्यात आल्या. कारखाना बंद होवून दोन महिने उलटून जावूनही फेब्रुवारी महिन्यातील बील अदा केले नाही. त्यामुळे हे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
“आम्ही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ या महिन्यात श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स या साखर कारखान्यास मोठ्या विश्वासाने ऊस दिला. परंतू अजून आमच्या ऊसाचा पहिला हप्ता दिला नाही. आम्ही ऊस बिलाची वाट पाहून थकून गेलो आहोत. कोणत्याच साखर कारखान्याने ऊसाचे बील ठेवले नाही. या साखर कारखान्याने मात्र आम्हाला धोका दिला आहे. पून्हा ह्या साखर कारखान्यावर आमचा विश्वास राहणार नाही. त्वरीत ऊस बील द्या नाहीतर आम्ही कारखाना साईटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत.”
विठ्ठल कदम, ऊस उत्पादक शेतकरी
“आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स साखर कारखान्याने येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊसाचे थकीत बील नाही दिले तर नांदेड येथील साखर सह आयुक्त कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची जिल्हा प्रशासन आणि एल एल पी शुगर्सच्या प्रशासकाने नोंद घ्यावी. जोवर ऊसाचे बील खात्यात जमा होणार नाही तोवर हे आंदोलन बेमुदत चालू राहील. या आधी गतवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचे शिल्लक १०० रुपये मिळवून देण्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन केले होते. पैसे जमा झाले तेव्हाच उठलोत. आता मुक्काम ठोको आंदोलन करणारच सोडणार नाहीत."
किशोर ढगे पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना परभणी
Published on: 09 May 2025, 01:36 IST