Cm Eknath Shinde : राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. त्या रोखण्यासाठी राज्य सरकार आता सांप्रदाय अर्थातच वारकऱ्यांची मदत घेणार आहे. शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे. अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. तेव्हा शिंदे बोलत होते, असं वृत्त मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
अंबरनाथ येथिल मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उपस्थिती लावली. तेव्हा शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात अखंड हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे.
अंबरनाथमधील उसाटणे गावात २ ते ९ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी याठिकाणी हजेरी लावली होती. तसंच या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी अश्व रिंगण पार पडले त्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले होते. हा सोहळा पाहण्यासाठी अंबरनाथ, ठाणे, कर्जतमधून वारकरी उपस्थित होते.
यावेळी भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वारकरी सांप्रदाय समाज प्रबोधनाचे काम करत असतो. त्यामुळे राज्याच्या ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत तेथे सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन करुन मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर काम होते का ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी १०० टक्के खर्च करण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी दिले आहेत. राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असंही मुंडे म्हणालेत.
Published on: 02 January 2024, 05:58 IST