राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे नेहेमी चर्चेत असतात. राज्याचे राजकारण नेहेमी त्यांच्या भोवती फिरते, असेही म्हटले जाते. असे असताना आता त्यांनी अनेक किस्से सांगितले. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. शरद पवार म्हणाले, की मला लोक शेतीच्या जास्त अडचणी सांगतात. त्यांना मी अजूनही शेती खात्याचाच मंत्री असल्यासारखंच वाटते, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच लोक अजूनही मला सरकारी निर्णय घ्या, हे करा ते करा सांगतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. मात्र, त्यावर पुन्हा पवार म्हणाले की, टाळ्या वाजवून काही उपयोग नाही, कारण मी मंत्री नाही. यामुळे एकच हशा पिकला. शरद पवार अनेक वर्ष देशाचे कृषीमंत्री होते. यामुळे शेती क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. यामुळे त्यांना शेतीच्या प्रश्नांची खडानखडा माहिती आहे.
सध्या शेतीचे खूप प्रश्न आहेत. पण भुकेचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच ते म्हणाले, मी 2004 ला कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यानंतर सहीसाठी पहिली फाईल ब्राझीलवरुन गहू आयात करण्यासंदर्भातील होती. मात्र हे बघून मला काहीसे वाईट वाटले, याचे कारण म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबात वावरतो आणि आपल्या देशाला गहू आयात करावा लागतो.
यामुळे मी त्या फाईलवर काही सही केली नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा फोन आला. ते म्हणाले की फाईलवर तुम्ही सही केली नाही. आपल्या देशात गव्हाचा स्टॉक किती आहे हे आपल्याला माहित आहे का? केवळ 20 ते 25 दिवस पुरेल एवढाच गव्हाचा स्टॉक देशात आहे. तो संपला तर देशात संकट येईल, त्यांच्या फोननंतर मला त्याठिकाणी सही करावी लागल्याचे देखील पवार यांनी सांगितले.
त्यानंतर मात्र हे चित्र बदलण्याचे मी ठरवले. नंतर आपला देश गव्हाचा जगातला दोन नंबरचा निर्यात देश झाला. तांदळाच्या बाबतीत एक नंबरचा निर्यतदार झाला. त्यावेळी धोरण नीट होती. त्याचा परिणाम अन्नधान्यात आपला देश स्वयंपूर्ण झाल्याचे पवार यांनी सांगितले. कन्हेरी येथे महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फा च्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या;
Onion Market; शेतकऱ्यांनो तुम्ही साठवून ठेवा आणि ग्राहकांनो तुम्ही आता खरेदी करा, कांद्याच्या दरात मोठी घट
यावर्षी ऊस? नको रे बाबा, ऊस घालवता घालवता शेतकऱ्यांना आले नाकीनऊ
Watermelon; शेतकऱ्यांनो तुमचा माल तुम्हीच विका, कशाला कोणाची धन करता? वाचा सगळं गणित...
Published on: 25 March 2022, 03:17 IST