मुंबई : राज्यातील 31 कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य चाळणी यंत्र वसवण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची प्रतवारी बाजार समितीतच करता येणे शक्य होणार असल्याने शेतमालास वाजवी व योग्य बाजारभाव मिळणे शक्य होईल. शासनाच्या सहकार विभागाने या संबंधितचा शासन निर्णय जरी केला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा यासाठी शेतमाल स्वच्छ व प्रतवारी केलेला असावा यासाठी शेतकरी ह्या गोष्टी वेळखावू असल्याने शेतकरी प्रतवारी करणे टाळत होता व प्रतवारीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी सुविधा नव्हती प्रतवारी न केल्यामुळे योग्य भाव मिळत नव्हता या प्रश्नावर मात करण्यास धान्य साफसफाईसाठी धान्य चाळणी यंत्र बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आल्यास शेतकऱ्याला धान्य प्रतवारीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल, या दृष्टीने राज्यातील 31 बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उभारण्याचा विचार सरकार करत होते.
बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसवण्यास राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडूनही मंजुरी मिळाली आहे. राज्यातील 31 बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी 1 यंत्र बसवण्यात येणार आहे, त्यासाठी 20.21 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडून त्यासाठी 5.05 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, तर 75 टक्के निधी बाजार समिती स्वत: खर्च करणार आहे.
सर्व बाजार समित्यांत प्रत्येकी 2 मे. टन प्रति तास क्षमतेचे एक धान्य चाळणी यंत्र बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Published on: 09 September 2018, 06:11 IST