राज्यातील शेतीचे आरोग्य खराब झाले असून कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग माती परीक्षणावर भर देणार असून यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी आपल्या मातीच्या बॉक्सवर माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह सविस्तर माहिती लिहून पोस्ट ऑफिसच्या मदतीने माती परीक्षण केंद्राला पाठवावी. मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
लातूरमधील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.धनंजय मुंडे म्हणाले, माती परीक्षण करताना ती माती कोणत्या पिकांसाठी योग्य आहे, कोणत्या पिकांसाठी योग्य नाही, कोणत्या पिकांमुळे मातीचे कर्ब वाढेल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, त्याचबरोबर कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेणार आहे.
तसेच बांबू हे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे असल्याने लातूर आणि सातारा सारखी बीडमध्येही प्रायोगिक तत्वावर बांबू लागवड केली जाणार आहे. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे.
यापुढे आपणही या बांबू लागवडीच्या चळवळीचा कार्यकर्ता असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अधिकाधिक बांबू लागवड करावी असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Published on: 08 October 2023, 12:10 IST