News

देशात कोळसा टंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे राज्यातील औष्णिक ऊर्जा केंद्रातील वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे.त्यातच महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील तेरा संच कोळसा अभावी बंद पडले आहेत.

Updated on 11 October, 2021 10:12 AM IST

देशात कोळसा टंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे राज्यातील औष्णिक ऊर्जा केंद्रातील वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे.त्यातच  महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील तेरा संच कोळसा अभावी  बंद पडले आहेत.

यामध्ये महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी दोनशे दहा मेगावॅटचे तसेच पारस 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. तसेच गुजरात मधील कोस्टल गुजरात पावर लिमिटेड चे 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पावर लिमिटेड चे 810 मेगावॅट चे तीन संच सध्या बंद आहेत. त्यामुळे अष्टक वीजनिर्मिती केंद्रातून मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

 कोळशाची टंचाईचेसंकट गडद होत असताना राज्यात ऑक्टोबर हीट चा प्रभावामुळे उष्णता वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. राज्यात शनिवारी 17 हजार 289 मेगावॅट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरण कडून पुरवठा करण्यात आला. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषी वाहिन्यांवर दररोज आठ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजे दरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

ज्या कालावधीमध्ये विजेची सर्वाधिक मागणी असते या कालावधीमध्ये विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व पुरवठा यातील तूट कमी होईल व लोडशेडिंग करण्याची गरज भासणार नाही.

 विजेची मागणी व उपलब्धता या मधील सध्या 3330 मेगावॅट ची  तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू आहे. देशभरात ऊर्जेची मागणी वाढल्यामुळे वीजदर महाग होत आहेत खुल्या बाजारातून सातशे मेगावॉट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे.

English Summary: scarcity of coal effect on electricity in maharashtra
Published on: 11 October 2021, 10:12 IST