मालेगाव: यंदाचे वर्ष उत्पादकता वाढ वर्ष म्हणून आपण साजरा करीत आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी पिकाची तांत्रिक माहिती कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचेकडून प्राप्त केली पाहिजे. मृद आरोग्य पत्रिकेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा पिकांना दिल्यास उत्पादन खर्चात बचत होईल असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
तालुक्यातील टेहरे येथे समुह आधारित विस्तार (Cluster Approach Agril Extension) कार्यक्रमांतर्गत मका बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी सरपंच श्रीमती चंदनाताई पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, मंडळ कृषी अधिकारी अशोक निरगुणे, जी. बी. शिंदे, श्रीमती दामोदर, बी. के. पाटील, श्री. खैरनार, शैलेंद्र वाघ, चंदू शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, प्रभाकर शेवाळे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, मालेगाव उपविभागांतर्गत मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यात खरीप हंगामात मका व कापूस या पिकांसाठी समूह आधारित कृषी विस्तार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यात १४ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, चालू वर्षापासून प्रथमच बांधावर रासायनिक खते व बियाण्यांचा पुरवठा करण्याची संकल्पना राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत राज्यात सुमारे दोन लाख मे. टन रासायनिक खते व ७५ हजार क्विंटल बियाणे आज अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहच करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी कृषी विभागाने कडक धोरण स्विकारले आहे. महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता, या वर्षी शेतकरी महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रम देखील कृषी विभागाने हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज पुरवठा संबंधित बॅंकांनी करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
समूह आधारित कृषी विस्तार कार्यक्रमाची संकल्पना विषद करताना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे म्हणाले, या कार्यक्रमात विविध कंपन्यांचा सहभाग घेऊन रास्त भावात कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. तालुक्यात मका व कापूस या पिकांसाठी १,३३५ एकर क्षेत्रावर १४ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी एक प्रकल्प समन्वयकाची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रकल्पाचा स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, त्या प्रकल्पातील शेकऱ्यांना त्यांच्या पसंतीचा बियाणे वाटपाचा कार्यक्रम तालुक्यात सुरु आहे.
या कार्यक्रमात बियाणे, रासायनिक खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये, किटकनाशके, फेरोमॅन ट्रॅप, ठिबक सिंचन संच उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. या कंपन्यांकडून होलसेल दरात किंवा त्यांच्या सीएसआर मधून सवलतीच्या दरात निविष्ठांचा पुरवठा करण्यात येणार आहे. प्रकल्पातील सर्व सहभागी शेतकऱ्यांच्या मृद आरोग्य पत्रिकेप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पिकांच्या पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंत तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: 16 June 2020, 10:19 IST