देशात रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे, शेतकरी बांधव खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून रब्बी हंगामाकडे बघत आहेत. राज्यात देखील रब्बी हंगामासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहे, राज्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. राज्यात कांदा लागवड ही खूप लक्षणीय आहे, तसेच राज्यातील कांद्याला परराज्यात देखील मोठी मागणी आहे. राज्यातील अनेक शेतकरी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कांदा पिकावर अवलंबून आहेत. याच पश्चिम महाराष्ट्रातील एका अवलिया शेतकऱ्याने महाराष्ट्रातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाणारे कांद्याच्या एका नवीन वाणाचा शोध लावला आहे. पश्चिम महाराष्ट्रमधील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे पाटस गावचे रहिवाशी संदीप घोले यांनी हा चमत्कार केला आहे.
त्यांनी विकसित केलेल्या कांद्याला देखील त्यांचेच नाव देण्यात आले आहे. संदीप कांदा शेतकऱ्यांसाठी जणू एक वरदानच ठरत आहे, कारण की या वाणाची टिकवणक्षमता ही इतर वाणांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. संदीप कांदा हा जवळपास आठ महिन्यापर्यंत चाळीत साठवला जाऊ शकतो. तसेच संदीप कांदा हा अनेक रोगांपासून लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे संदीप कांदा ही कांद्याची वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. या अवलिया शेतकऱ्याला त्याच्या या उत्कृष्ट कामासाठी 2019 साली महामहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्याकडून सन्मानित देखील करण्यात आले आहे.
कोण आहेत संदीप घोले
मूळचे पाटस गावचे रहिवासी संदीप घोले हे कुणी शास्त्रज्ञ नव्हे, ते एक साधारण शेतकरी आहेत. कांदा बियाण्यात चालू असलेली घालमेल, बियाण्याचा निकृष्ट दर्जा व यामुळे शेतकऱ्यांचे होणारे प्रचंड नुकसान, संदीप घोले यांच्या काळजाला भिडत होते. संदीप घोले स्वतः एक कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना कांदा टिकवण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. कांदा लवकर खराब होत होता, तसेच कांद्यावर अनेक प्रकारचे रोग अटॅक करत होते. या सर्व अडचणींचा विचार करून संदीप यांनी तब्बल आठ वर्ष कांदाची नवीन वाण विकसित करण्यासाठी खर्च केलेत, आणि मग संदीप कांदा ही वाण विकसित केली. त्यांनी विकसित केलेल्या वाणामुळे कांद्याचे उत्पादन हे प्रतिहेक्टरी 8 टनपर्यंत वाढले आहे.
संदीप कांदा फक्त आपल्या राज्यातच प्रचलित आहे असे नाही, तर तब्बल आठ राज्यात या जातीच्या कांद्याची लागवड ही केली जात आहे, आणि त्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी यातून चांगली मोठी कमाई करत आहेत. संदीप कांदा या कांद्याच्या वाणापासून अधिक उत्पादन तर प्राप्त होतेच शिवाय उत्पादन खर्च हा इतर जातींपेक्षा खूपच कमी आहे. संदीप घोले यांनी केलेल्या या अभूतपूर्व कामाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नामक एका संस्थेने घेतली, आणि त्यांच्या या नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. संदीप कांदा ही कांद्याची वान इतर जातीच्या तुलनेत जास्त काळ टिकते, असे सांगितले जाते की, संदीप कांदा हा जवळपास आठ महिने साठवला जाऊ शकतो. त्यामुळे कांद्याची ही वाण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान सिद्ध होत आहे. आणि भविष्यात या जातीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुपटीने वाढेल.
Published on: 25 December 2021, 11:49 IST