अहमदनगर- बहुचर्चित मुंबई-नागपूर महामार्गाचे(Mumbai-nagpur highway) काम सध्या प्रगतीपथावर आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पदरी भरपाई म्हणून कोट्यावधी रुपये पडले. मात्र, विस्थापित शेतकऱ्यांची भरपाईच्या पैशातून पुन्हा जमीन खरेदी करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. कोट्यावधी रुपये खिशात असताना देखील शेतकऱ्यांना पुन्हा शेतजमीन मिळणे अशक्य होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व परिसरातील तालुक्यात गेल्या दहा वर्षात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आले. शिर्डी विमानतळ (Shirdi airport), समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. प्रत्यक्ष विमानतळ आणि बायपासकरिता परिसरातील गावांतील अनेकांनी जमिनी दिल्या. कमी श्रमात अधिक दाम मिळत असल्याने अनेकांनी जमिनीवर पाणी सोडण्यात धन्यता मानली.
जमीन देतं का कुणी?
समृद्धी महामार्गात विस्थापित झालेले शेतकरी पुन्हा नव्याने जमीनीच्या शोधात आहेत. खिशात कोट्यावधी रुपये असताना नव्याने जमीन खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहे. आवश्यक क्षेत्रात जमीन उपलब्ध होत नाही. सध्या शेतजमीन विक्रीसाठी काढली जात नाही. प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्प, पुणे-सिन्नर-नाशिक रेल्वेमार्ग यामुळे सध्या जमीनीचे अर्थकारण तेजीत आले आहे. मूळ शेतकरी आपली जमीन सोडण्यास तयार नाही.
Published on: 01 October 2021, 05:06 IST