परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पास बाजरी व मका पिकांतील संशोधनाबाबत महिंद्रा आणि महिंद्रा समृध्दी अवार्ड 2019 चा कृषी संस्थान सन्मानाने दिनांक 18 मार्च रोजी नवी दिल्ली येथे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अमिताभ कांत, महिंद्रा आणि महिंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. पवन कुमार यांचे हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणुन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, राष्ट्रीय कृषी अशोक दलवाई आदीसह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सद्यपरिस्थीतीत पिक पध्दतीत बदलाने खाद्य संस्कृती ही बदलत आहे. मागील काही वर्षामध्ये राज्यात ज्वारी आणि बाजरी या अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. या बदलामुळे आपले मुख्य अन्नात ग्लुटेनयुक्त गव्हाच्या चपातीचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. ज्वारी, बाजरी नाही तर चारा नाही, चारा नाही तर जनावरे नाहीत आणि जनावरे नाहीत तर शेतीला शेणखत नाही. अर्थात पिक पध्दतीतील बदलाच्या या फेऱ्यात मानवी आणि मातीचे आरोग्यही बिघडत चालले आहे.
अशा परिस्थतीतीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, इक्रीसॅट संस्था हैदराबाद व अखिल भारतीय समन्वयीत बाजरी सुधार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बाजरी पिकामध्ये अधिकतम लोह व जस्त युक्त एएचबी-1200 (AHB 1200 Fe) आणि एएचबी-1269 (AHB 1269) संकरीत वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत करण्यात आले आहेत. या वाणांमुळे खाण्यास पौष्टीक आणि आरोग्यदायक बाजरीची भर पडली असल्याने राज्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्यास हातभार लागेल. या संशोधनामुळे आदिवासी भागातील कुपोषीत लहान मुले आणि महिलांच्या खाद्यामध्ये लोह आणि जस्तयुक्त बाजरीचा समावेश केल्यास कुपोषण कमी करण्यास व महिलांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. संशोधन केंद्राने विविध पिकांच्या संशोधन शिफारशी (बाजरी व मका) दिलेल्या असुन विस्तार कार्याद्वारे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे.
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सुर्यंकांत पवार तसेच पैदासकार डॉ. दिपक पाटील, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, प्रा. दिनेश लोमटे, डॉ. एस आर जक्कावाड, डॉ. नितीन पतंगे, प्रा. सुरेखा कदम, श्री. राजेंद्र सावंत आदीसह सेवानिवृत्त पैदासकार डॉ. नंदकुमार सातपुते, डॉ. घुगे, श्री. ठोंबरे, श्री. कनिमर, श्री. चक्रे, श्री. दहिफळे, श्री. लघाने, श्री. माने, श्री. वाघमारे आदींचे संशोधनात योगदान आहे. या सन्मानाबाबत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले यांनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले व भविष्यात देखील चांगले कार्य चालु ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.
Published on: 08 April 2019, 07:59 IST