गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठा वाद सुरु आहे. यामुळे सध्या युद्धाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेकांचे जीव यामध्ये गेले आहेत. असे असताना याचा परिणाम अनेक गोष्टींवर होत आहे. आता महाराष्ट्र्रातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर बाजारात सोयाबीनला सात हजार रुपयांच्यावर भाव मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७३०० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोयाबीनचे भाव वाढले असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
दरम्यान, रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोयाबीनचे दर भारतात वाढले असावेत, असा अंदाज व्यापारी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया भारताला आरबीजी पामोलिन आणि कच्चा पामतेलाचा पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. तसेच कच्चे सूर्यफूल तेल युक्रेन, रशिया आणि ब्राझीलमधून आयात करण्यात येते. पण सध्या रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम भारतात देखील दिसून येत आहे. या युध्दामुळे गहू, नैसर्गिक वायू यांच्या किंमतीत वाढ होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रशिया युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे काहींना फायदा तर काहींना याचा तोटा सहन करावा लागणार आहे. असे असताना गेल्या १० दिवसांमध्ये सोयाबीनचे दर १ हजारांनी वाढलेले आहेत. शिवाय सोयाबीनच्या दारात अजून वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ७००० रुपये होता, गुरवारी हा दर प्रति क्विंटल ७३०० रुपये झाला. गेल्या २४ तासांत सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन भाव वाढीचा फायदा होणार आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची चांदी झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या दर वाढीची अपेक्षा नव्हती, असे शेतकरी सांगत आहेत. यामुळे आता हे दर किती दिवस टिकून राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच सोयाबीन बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. सध्या कांद्याला देखील चांगले दर मिळत आहेत. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.
Published on: 25 February 2022, 10:18 IST