रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेन मधील परिस्थिती मोठी दयनीय झाली आहे, या युद्धामुळे भारतात काही विशेष असा फरक पडणार नसल्याचे सांगितलं जातं आहे, याउलट भारतातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे. देशातील सोयाबीन आणि गव्हाला युद्धामुळे अधिक बाजारभाव मिळत आहे. मात्र या युद्धामुळे जरी भारतात काही परिणाम होत नसला तरी या युद्धाच्या नावाखाली शेतकऱ्यांची ठगी होत असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलीकडे सोशियल मिडियामुळे दिल्लीची बातमी नव्हे-नव्हे तर जगातील कुठल्याही कोपऱ्यातील बातमी गल्लीपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.
ग्लोबल व्हिलेजमुळे जगातील कोणतीही घटना एका क्षणात लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे, पण यामुळे फक्त खरीच बातमी पसरवली जाते अस नाही तर अनेकदा सोशियल मिडियातुन चुकीची बातमी तसेच अफवांचा देखील प्रसार होत असतो. याचाच प्रत्यय समोर आला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून. आधीच रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आयात-निर्यातिला मोठा फटका बसला आहे. यामुळे जगभरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळेच जगात सर्वत्र वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात देखील रशिया युक्रेन या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका अफवेने जन्म घेतला आणि यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. परंतु द्राक्ष बागायतदार संघाने या अफवेच वेळेत खंडन केले म्हणून द्राक्ष बागायतदारांचे होणारे लाखों रुपयांचे नुकसान टळले. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रशियाला महाराष्ट्रातून सुमारे 35 हजार मेट्रिक टन एवढे द्राक्ष निर्यात केले जातात. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातून निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षापैकी निम्म्याहून अधिक द्राक्ष द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातून रशियास पाठवले जातात. द्राक्षांचा हंगाम नुकताच सुरू झाला आणि रशिया, युक्रेनचे युद्ध पेटले यामुळे काही भामट्या व्यापाऱ्यांनी एक नामी शक्कल लढवत या युद्धाचा निर्यात प्रक्रियेवर मोठा प्रभाव होत असल्याचे खोटे वृत्त सोशल मीडियावर मुद्दामून पसरविले.
या भामट्यांनी युद्धामुळे निर्यातीस अडचण होत असल्याने द्राक्षाचे बाजार भाव खूप कमी झाले अशी अफवा वेगात पसरवली. रशिया आणि युक्रेन यामध्ये निर्माण झालेली युद्धाची परिस्थिती ही एक मोठी धक्कादायक बाब आहे यामुळे जगात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच आपल्या शांतिप्रिय स्वभावामुळे ओळखला जाणारा भारत देश या युद्धाला शांततेने समाप्त करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत आहे. परंतु या दुःखद गोष्टीत देखील राज्यातील अनेक भामटे व्यापारी फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. या अफवेवर द्राक्ष बागायतदार संघटनेने वेळीच खुलासा केल्याने आणि सत्य परिस्थिती त्यांच्या पुढ्यात ठेवल्याने होऊ घालणारे नुकसान टळले असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत द्राक्ष बागातदार संघटनेने सांगितले की, या युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर तिळमात्र देखील फरक पडणार नसून यामुळे द्राक्षाच्या दरात घसरण देखील होणार नाही. त्यामुळे राज्यातील द्राक्ष बागायतदारांनी अशा अफवेस बळी पडू नये व घाबरून न जाता संयमाने व योग्य वेळी द्राक्षाची विक्री करावी. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध जरूर सुरू आहे, मात्र हाती आलेल्या माहितीनुसार रशियामध्ये आयात-निर्यात अजूनही सुयोग्य असल्याचे देखील बागायतदार संघाने यावेळी नमूद केले.
Published on: 02 March 2022, 10:24 IST