वनामकृवितील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना देशात सर्वोत्‍कृष्‍ट

21 December 2019 10:57 AM


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषी हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेस 2018 सालचा देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन ग्‍वालियर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठात आयोजित ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेच्‍या 13 व्‍या वार्षिक आढावा राष्‍ट्रीय बैठकीत सन्‍माननित करण्‍यात आले.

स‍दरिल सन्‍मान नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे व श्री. प्रमोद शिंदे यांनी स्‍वीकारला. कार्यक्रमास ग्‍वालियर येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस.के. राव, जबलुपर येथील अटारीचे संचालक डॉ. अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सिंग, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक उपसंचालक (कृषी विस्‍तार) डॉ. रणधीर सिंग, ग्‍वालीयार कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. जे. पी. दिक्षीत, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. एस. एन. उपाध्‍याय, कार्यक्रम आयोजक डॉ. यु. पी. एस. भथुरीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वनामकृवि शास्‍त्रज्ञ लिखित ‘हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन’ पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

सदरिल वनामकृवितील योजना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी श्री. प्रमोद शिंदे, डॉ. यु. एन. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. राहुल बगेले, प्रा. ए. टी. शिंदे, श्री. पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.

भारतीय कृषी मंत्रालय व पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजने अंतर्गत देशात 130 कृषी हवामान केंद्र कार्यरत असुन परभणी विद्यापीठातील केंद्र 2007 साली सुरू झाले. या केंद्राच्‍या वतीने पिकांची पेरणीपुर्व ते पिक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारीत नियोजन कसे करावे यांचे सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते. या केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील जिल्‍हा पातळीपर्यंत शेतकरी बांधवाना आठवड्यातून दोन वेळा मंगळवार व शुक्रवार कृषी हवामान सल्‍ला दिला जातो, यात पुढील पाच दिवसांकरिता पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा व ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो, याआधारे कृषी सल्‍ला दिला जातो.

स‍दरिल सल्‍ला जिल्हानिहाय आकाशवाणी, दुरदर्शन, वर्तमानपत्रे, प्रसार माध्‍यमे, कृषी विज्ञान केंद्रे, किसान पोर्टल एसएमएस, मोबाईल एप्‍स, व्‍हॉटसएप ग्रुप, संकेतस्‍थळ, ब्‍लॉग आदींच्‍या माध्‍यमातुन पन्‍नास लाख पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला जातो. या वेळोवेळी प्रसारित केलेल्‍या हवामानातील बदलातील सावधानतेच्‍या इशारामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले होणारे शेतीतील नुकसान प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष टाळणे शक्‍य होत आहे. या कार्याचा गौरव म्‍हणुन देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन वनामकृविच्‍या ग्रामीण मौसम सेवा केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले.

ग्रामीण कृषी मौसम सेवा Rural Agricultural Weather Service वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठ Rajmata Vijayaraje Scindia Krishi Vishwa Vidyalaya Gwalior
English Summary: Rural Agricultural Weather Service Scheme of VNMKV Parbhani is one of the best in the country

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.