इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्मा या देशातील खासगी साखर उद्योगाच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या अध्यक्षपदी बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली.
विस्मा (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) या संघटनेनंतर रोहित पवार यांनी इस्मा या संघटनेचे मागील वर्षी उपाध्यक्षपद स्विकारले. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये रोहित पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. त्यांच्या या धडाडीच्या कामाची दखल घेत इस्मा या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. देशातील 220 साखर कारखान्यांचे प्रतिनिधीत्व इस्मा करते. दरवर्षी 50 हजार कोटींची आर्थिक उलाढाल, 50 लाख ऊस उत्पादक व 5 लाख कामगारांशी थेट जोडली गेलेली ही संघटना साखर उद्योगासंदर्भात धोरण ठरवण्यास सरकारला मदत करते. ऊस उत्पादनातील चढउतारा वेळी बाजारभाव स्थिर ठेवून साखर उद्योजक, ऊस उत्पादक, कामगार यांचा समतोल राखण्यास मदत करते. मागील वर्षी रोहित पवार उपाध्यक्ष होते. सध्या ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचेही संचालक आहेत.
यापुढे माझी जबाबदारी वाढली आहे, या संघटनेच्या माध्यमातून देशातील साखर उद्योगातील आव्हाने व समस्या सोडविण्यासाठी चांगले योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
Published on: 23 September 2018, 06:47 IST