पुणे
तलाठी परिक्षा (Talathi Exam) पार पडत असताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यातील सर्वच परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावरुन आमदार रोहीत पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
रोहीत पवार यांनी ट्विट करुन सरकारवर टीका केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, "तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?", असा सवाल आमदार रोहीत पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, "प्रामुख्याने बहुजन समाजातील मुलांनाच आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशा मुलांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी मुक्त विद्यापीठ स्थापन केलं. पण सरकारने या शिक्षणाच्या शुल्कातही दुप्पट वाढ करुन शिक्षण हे फक्त धनवानांनाच घेता येईल, याचीच सोय केली की काय अशी शंका येते. त्यामुळं सामान्यांच्या आणि सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या या सरकारने ही शुल्कवाढ तातडीने रद्द करावी", अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तलाठी परीक्षेवर आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना १० वाजता परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. पहिला पेपर उशीर झाल्याने दुपारचं वेळापत्रक कोलमडले.
Published on: 21 August 2023, 03:26 IST