नवी दिल्ली
भारतात तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पण यंदा भारतात तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदूळ निर्यातबंदीचा भारताने निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाचा शेजारील देशांसह इतर देशांना देखील फटाका बसत आहे. नेपाळला देखील या निर्णयाची चांगलीच झळ बसू लागली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांची ५ ऑगस्ट रोजी टेलिफोनवरुन चर्चा झाली. यावेळी तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय नेपाळला लागू होणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या पंतप्रधानांना दिलं आहे.
पुढे मोदी म्हणाले की, भारतातून नेपाळला पहिल्यासारखी निर्यात सुरु राहिल. त्याशिवाय नेपाळला अन्य खाद्यपदार्थांची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदी यांना नेपाळला दिलं आहे, असं वृत्त पीआयबीने दिलं आहे.
सध्या देशात भाजीपाल्याने देखील महागाईचा कळस गाठला आहे. टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. त्यात आणखी कुठल्या फळ भाज्या किंवा धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सतर्क भूमिका घेतली आहे.
दरम्यान, भारतात तांदळाच उत्पादन चांगल्या प्रमाणात होते. भारतीयांच्या आहारात तांदूळ हा महत्त्वाचा घटक आहे. तसंच येणारा काळ भारतात सणासुदीचा असल्याने तांदळाच्या तुटवड्यामुळे समस्या निर्माण होऊ नये. यामुळे केंद्राने तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.
Published on: 07 August 2023, 01:31 IST