मुंबई
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १० हजार रुपयांची आर्थिक मदत अजित पवार यांनी जाहीर केली आहे.
तसंच दुकानांचे नुकसान झाले असल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे तर मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
"पावसाच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असतील त्या पूर्ववत करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी निर्णय घ्यायचा आहे. पुरात बाधित झालेल्या व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचं वाटप करावं," असे निर्देशही अजित पवारांनी दिले आहेत.
"ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना सध्याच्या दराने 5 हजारने सानुग्रह देण्याची कारवाई सुरु करायची, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सानुग्रह 10 हजार देण्याचा आताच निर्णय घेण्यात आला”, असं अजित पवार विधान परिषदेत स्पष्ट म्हणाले.
Published on: 24 July 2023, 06:02 IST