News

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. यावेळी राज्यातून शिवभक्त महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र, गेली दोन वर्षांपासून शिवभक्तांना आपला उत्साह दाबून धरावा लागत होते.

Updated on 14 February, 2022 2:55 PM IST

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. यावेळी राज्यातून शिवभक्त महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. 

मात्र, गेली दोन वर्षांपासून शिवभक्तांना आपला उत्साह दाबून धरावा लागत होते. मात्र, यावर्षी शिवजयंतीसाठी कोरोना नियमावलीत शिथिलता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी आठवडा शिल्लक असला तरी हि बातमी शिवभक्तांसह राज्याला दिलासा देणारी आहे.देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. तर याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावर्षी शिवजंयती साजरी करण्यासाठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नियमावली जाहीर झाल्यानंतर ती विविध खात्यांना दिली जाईल, असेही ते  म्हणाले.

तर मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि मला शिवनेरी किल्ल्यावरील जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्याचं अजित पवार यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टर प्रवासाची परवानगी दिलेली नसल्याने शिवनेरीवरील कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जन्मसोहळ्यातील कार्यक्रमात आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शिवेनरीवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरी मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. 

त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत मात्र सर्वांना मास्क वापरावेच लागेल असे हि उपमुख्यमंत्री म्हणाले.

English Summary: Relaxation for Shiva Jayanti; Ajit Pawar and Aditya Thackeray will be present
Published on: 14 February 2022, 02:55 IST