News

पिंपरी-चिंचवडमध्ये हा 'रेकॉर्ड ब्रेक'उत्सव होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून, बैलगाडा मालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Updated on 26 May, 2022 6:10 PM IST

शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचा भाग म्हणजे बैलगाडा शर्यत होय अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत असतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसह बैलगाडा हौशी बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. जेव्हा सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले. मात्र,आता देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यात भरवण्यात येत आहे.

नुकत्याच देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी 'टोकन बूक' प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात अवघ्या तीन तासांत २ हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली. एवढ्या कमी वेळात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने टोकन बूक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत असल्याचं म्हटलं जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये हा 'रेकॉर्ड ब्रेक'उत्सव होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून, बैलगाडा मालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने

टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. दि. २८ मे ते ३१ मे २०२२ सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अत्यंत काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही शर्यत पार पडणार आहे. बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकार आहे. गुरूवारी ,रामायण मैदानावरील सभागृहात सकाळी ९ ते १२ या दरम्यान टोकन स्विकारण्यात आले.

यावेळी बैलगाडा मालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या टोकनमधून 'लकी ड्रॉ' काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये २ हजार नावांच्या चिठ्ठया असतील. त्यात ज्याची पहिली चिठ्ठी येईल तो बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले आहे. टोकनची रक्कम ही घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाईल. असे राहुल सस्ते यांनी सांगितले.

घाट एकूण १२ सेकंदाचा आहे. त्यानुसार डिजिटल घड्याळाच्या मदतीने बैलगाडा किती सेकंदात शर्यत पूर्ण करतो याची नोंद केली जाते. या घाटात साधारण २ हजार बैलगाडा धावणार असून यापैकी पहिल्या १२० गाडा मालकांना दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणाऱ्या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक अशा बक्षीसांसाठी शर्यत होणार आहे.

शेतकऱ्यांनो असा प्रयोग का करत नाही? भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा, झाले मालामाल

लाखोंच्या बक्षिसांचा लयलूट होणार असल्यामुळे शर्यतीला देशभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी टोकन बुक केले आहे तर महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, जालना, नाशिक, सिन्नर यासह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी या शर्यतीसाठी नोंदणी केली आहे.

म्हणूनच या शर्यतीला राज्यातील आणि देशातील पहिली व सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून बोलले जात आहे. बैलगाडा शैर्यतीसाठी मालकांचीच आणि शेतकऱ्यांचीच एवढी गर्दी आहे तर बघ्यांची संख्या किती असेल याचा अंदाज लावणे कठीणच. या पार्श्वभूमीवर बैलगाडा घाटाचा पूर्ण ताबा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे देण्यात आला आहे.

स्वतंत्र बैलगाडा पार्किंग व्यवस्था, टू-व्हीलर व फोर व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक चौकामध्ये बैलगाडा मालकांसाठी पार्किंग व दिशादर्शक फलक लावले आहे. चार दिवस जेवण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रत्येक गाडामालक आणि बैलगाडी मालकाला टी-शर्ट आणि टोपी देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर, सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी एल.ई.डी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही संयोजकांनी सांगितले.

आता पाहुयात या शर्यतीचे काही नियम -

१- बैलगाडा मालकाने एकदा जुंपलेला बैल दुसऱ्या गाड्यामध्ये जुंपू नये. अन्यथा दोन्ही गाडे बाद करण्यात येतील.
२- प्रत्येक बैलाची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
३- जुकाटाखाली आलेला बैल जर मालकाने खिळ मारुन बाहेर काढला तर त्या गाड्याचे सेकंद गृहीत धरले जाणार नाही.
४- दि.२८ ते ३१ मे पर्यंत घाटाच्या तळामध्ये बॅरिकेट सिस्टीम केलेली असल्यामुळे केवळ बैलगाडा मालक आणि जुंपणारे बैल यांनाच बॅरिकेटमध्ये सोडणार.
५- बैलगाडा घाटाचा तळ आणि निशाना जवळील भाग रिकामा ठेवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:
डाळिंब उत्पादक शेतकरी हताश; संकटांची मालिका सुरूच आधी तेल्या, मर आणि आता...
शॉर्टसर्किटमुळे महिला शेतकऱ्याच्या दोन गायी दगावल्या;भरणे मामांची थेट 50 हजाराची मदत

English Summary: Registration of 2,000 bullock carts in just 3 hours; bullock cart race
Published on: 26 May 2022, 06:10 IST