जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत बंद आहेत, त्यामुळे कांदा दरावर दबाव वाढला आहे. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे चार दिवसांत २०० रुपयांची घसरण झाली आहे. किमान दर ७०० व कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा सध्या मिळत आहे.
सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल, एवढा झाला आहे. आगाप लागवडीच्या उन्हाळ कांद्याची आवक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, धुळे जळगावमधील जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात सुरू झाली आहे. सुरवातीला दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
गेल्या शनिवारी (ता.२०) लाल कांद्याचे दर जळगाव बाजार समितीत किमान ८०० व कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात गेल्या दोन दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. तसेच आवकही वाढत आहे. यामुळे कांद्याच्या दरात क्विंटलमागे किमान २०० रुपये घसरण झाली आहे. दरावर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.जळगाव येथील बाजारात गेले चार दिवस प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल आवक झाली आहे. चाळीसगाव येथेही प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे.
आवक कमी आहे. तरीदेखील दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, खानदेशातून मध्य प्रदेश, गुजरातेतही लाल कांद्याची पाठवणूक केली जाते. परंतु मध्य प्रदेशातही कांद्याची आवक सध्या सुरू आहे. गुजरातेतही कांद्याची लागवड वाढल्याने तेथेही स्थानिक क्षेत्रातून कांदा उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी दरावर दबाव वाढला आहे. स्थानिक बाजारात कोरोना, लॉकडाऊनचा प्रभाव दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची स्थिती आहे.
Published on: 26 February 2021, 04:26 IST