Agriculture News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लढा पुन्हा एकदा हाती घेतला आहे. यलो मोझॅक रोग, बोंडअळीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारनं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका रविकांत तुपकरांनी केली. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून एल्गार यात्रा काढणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे .
1 नोव्हेंबरपासून शेगाव येथून संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेवून ही एल्गार यात्रा सुरु होणार असून 20 नोव्हेंबरला बुलढाणा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका निच्यांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. त्यामुळे या 20 दिवसात तुपकर हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रीत करून हे आंदोलन करणार आहेत असं रविकांत तुपकर म्हणालेत
1 नोव्हेंबरपासून सूरू होत असलेल्या या एल्गार यात्रेत सोयाबीन आणि कापूस दरवाढ, पिकांची नुकसान भरपाई, पिकविमा मिळण्यासंबंधीत मागण्या करण्यात येणार आहेत. आपल्या हक्कासाठी आपल्याला तीव्र लढा द्यायचा आहे. सरकारला शेतकरी आणि तरुणांची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे असंही रविकांत तुपकर म्हणाले. 25 ते 31 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन आणि कापूस पट्ट्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेवून जनजागृती करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे .
Published on: 26 October 2023, 11:20 IST