Farmer Protest Buldhana : राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर मागील काही दिवसांपासून लढा देत आहे. तरी सरकारकडून यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आता ताकद दाखवण्यासाठी १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली,गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडविण्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे.
प्रसार माध्यमातून भावना व्यक्त
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर आपण गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहोत. परंतु सत्तेच्या मस्तीत मश्गुल असलेले सरकार आपल्याला फसवत आहे. त्यांना शेतकर्यांची ताकद दाखवून देणार. त्यासाठी १९ जानेवारीला मलकापूर स्थानकावरून मुंबई, दिल्ली,गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडविणार आहोत, अशी भावना रविकांत तुपकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
मिसाळवाडी (ता.चिखली जि.बुलढाणा) येथे परिवर्तन तथा एल्गार मेळावा पार पडला. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात पुष्पवृष्टी करून तुपकरांचे स्वागत केले. तसंच लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. माझ्यावर ज्याप्रकारे विश्वास ठेऊन शेतकरी बांधव मदत करत आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या न्यायासाठी झगडणारे हे शेतकरी बांधव पदरमोड करून आंदोलनाला तसेच निवडणुकीसाठी आर्थिक बळ देत आहेत, असं देखील तुपकर म्हणाले.
शेतकरी आत्महत्या करतोय तरी सरकारकडून बघ्याची भूमिका
आंदोलनबाबत बोलताना तुपकर पुढे म्हणाले की, सोयाबीन-कापसाला भाव नाही. यावर्षीची नुकसान भरपाई, पिकविमा मिळाला नाही. दुष्काळाची मदत मिळाली नाही.मात्र सत्तेतील कोणत्याही नेत्याला शेतकऱ्यांबाबत खरी तळमळ राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आणि शेतकऱ्यांनी मेळाव्याला दिलेला प्रतिसाद हा सरकार विरुद्ध रोष व्यक्त करणारा होता. परिवर्तनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा यावेळी ओढा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. तसंच शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेऊन कोडगेपणाने शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा तमाशा बघत आहेत.
Published on: 16 January 2024, 12:01 IST