अहमदनगर- आशिया खंडातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय लक्ष्मीबाई पाटील जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार देशी बियांचे जतन व संवर्धन करणाऱ्या ‘पद्मश्री’ बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरस्काराची घोषणा केली. दोन लाख पन्नास हजार रुपये रोख,मानपत्र, रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
येत्या 9 मे रोजी सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ‘पद्मश्री’ सन्मानानंतर राहीबाई पोपेरे यांना जाहीर झालेला दुसरा सन्मान आहे. राहीबाई यांच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सीड मदर ते पद्मश्री
राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिला.
Published on: 25 September 2021, 09:32 IST