बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या पूरस्थितीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाहणी दौरा केला आहे. यावेळी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसह तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तंटपुंजी आहे. त्यामुळे त्यात बदल करुन एकरी १ लाख रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. बोरवेलमध्ये गाळ गेला आहे. विटभट्टी व्यावसाईकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्या सर्वांना मदत मिळावी अशाी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, बुलढाण्यात पूरस्थिती निर्माण होऊन ८ दिवस झाले तरी येथिल नागरिकांना मदत मिळाली याचा जबाब स्थानिक लोक प्रतिनिधींनी सरकारला विचारला पाहिजे. पण नुकसान झाल्यानंतर स्थानिक प्रतिनिधींकडून याबाबत काहीही बोललं जात नाही, असं म्हणत राजू शेट्टींनी स्थानिक आमदारांवर निशाना साधला आहे.
"या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक नागरिकांची घरे वाहून गेली आहेत. अशा नागरिकांचे स्थलांतर करून घरकूल योजनेतून या नुकसानग्रस्तांना घरे बांधून द्यावीत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनाही चांगली मदत जाहीर करावी" अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.
Published on: 29 July 2023, 06:19 IST