मुंबईसह कोकणाला पावसाने झोडपले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कोकणात झालेल्या पावासमुळे शेतीला फटका बसला आहे तर मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला. दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे आज पावसाचा जोर कमी होऊन उद्यापासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवरप आहे. कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागरते मध्य प्रदेशाचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
त्यामुळे राज्यात पावासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याची स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे.
Published on: 07 August 2020, 09:07 IST