राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पण दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावासासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून ते सोमवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात रायगडमधील भिरा येथे १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात जोर कमी झाला तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावासाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर राज्यातील इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कोकणताली अनेक भागात पावासाचा जोर कमी झाला आहे. धरणांतील पाणी पातळी स्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे, त्या भागातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान पावसामुळे भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसापासून कमी प्रमाणात पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात रविवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे.
Published on: 20 August 2020, 09:42 IST