राज्यात पुर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली. या पुर्वमोसमी पावसामुळे रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, चारा पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील अजून दोन दिवस पावसाचे संकट असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ३ ते ४ एप्रिलला मराठवाडा व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातत्याने येणारे पश्चिमी विक्षोभ तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यभर पाऊस होत आहे.
आयएमडीच्या अहवालानुसार, नैऋत्य मध्य प्रदेश व विदर्भात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तसेच नैऋत्य मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर कर्नाटक व मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे ३ व ४ एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तीन आणि चार एप्रिल रोजी मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आयएमडीने एप्रिल ते जून या काळातील तापमानाचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार एप्रिल ते जून या काळात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात राज्यातील सरासरी किमान तापमानात ०.५ ते १ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिके , संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, कांदापिकासह, भाजीपाला, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Published on: 01 April 2020, 12:24 IST