Rain News : देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला. तसंच राज्यातून परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. पण राज्याच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने तांडव घातलं आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
कोल्हापुरातील कसबा बावडा, शिये या भागात अतिवृष्टी सदृ्श्य पाऊस झाला. यामुळे सर्वच भागात पाणीचपाणी झाले. चौकाचौकात, बसस्टॅन्ड भागातील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांना काही अडचणीचा सामना करावा लागला.
कसबा बावड्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कोल्हापूर शहर, उपनगरांमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. खड्ड्यातील रस्त्यांमुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. कागल शहरात देखील जोरदार पाऊस झाला. या अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, गडहिंग्लजमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे या भागातील नागरिकांची काही धांदल उडाली. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांना गेल्या आठवड्यातील व आजच्या पावसाने दिलासा मिळाला.
Published on: 05 October 2023, 02:03 IST