इंदापूर : रविवारी रात्री इंदापूर तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळबागा, शेतीचे अपरिमीत नुकसान झाले आहे. कोरोनाच्या झपाट्याने गेल्या सहा महिन्यात शेती पिकाला बाजारभाव मिळत नसताना देखील जिद्दीने उभा रहात असणा-या शेतक-याचे गणित या पावसाने उद्ध्वस्त करुन टाकले आहे. शेती पिकाला हमीभाव मिळावा ही मागणी पुनश्च जोर धरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून वातावरणातला उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. उकाड्याने इंदापूरकर त्रस्त झाले होते. काल रात्री तालुक्यात सर्वदूर वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. सतत दीड दोन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. इंदापूर शहर व नजीकचा परिसर व भिगवण भागात चांगला पाऊस झाला. मात्र त्याचे वाईट परिणाम फळबागा, उसावर झाले.
ऊस पीक जमीनदोस्त झाले आहेत. नव्याने धरलेल्या डाळिंबाच्या बागांमधील फुलकळी व असणारी फळे गळून पडली आहेत. बहुतेक ठिकाणी हेच चित्र पहायला मिळते आहे. या संदर्भात गोखळी (ता.इंदापूर ) येथील भैरवनाथ सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नितीन गोफणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य व केंद्रशासनावर ताशेरे ओढत, किमान शेती व शेतकरी जगावा यासाठी तरी शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले की, रात्रीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील इतर गावांप्रमाणे आमच्या भागातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी या भागातील जवळपास शंभर ते दीडशे एकर ऊसाचे व दोनशे ते सव्वादोनशे एकर डाळिंब पिकाचे नुकसान केले आहे. कोरोना आला.त्या पाठोपाठ सुरु झालेल्या लॉक डाऊनमुळे शेतीला जोडधंदा असणारा दुधव्यवसाय दर नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दर नसल्याने मक्याचे पिक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा सारणी करून ठेवला आहे.दर नसल्याने सारणीमधील ५० टक्के कांदा सडून गेला आहे.यातून कुठेतरी शेतकरी कसाबसा उभारी घेत होता. त्याचे कंबरडे कालच्या पावसाने मोडले आहे.
ऊस झोपला आहे, असे सांगून ते म्हणाले की, लाखो रुपये खर्च करुन डाळिंबाच्या बागा जगवल्या. त्यावर तेल्या पडला. एक रुपयाचा ही फायदा झाला नाही. लाखांचे कर्ज उरावर असताना, धडा करुन नव्याने डाळिंबाच्या बागा धरल्या. या पावसाने त्यावरची फुलकळी व लागलेली फळे धुवून खाल्ली. आणखी किती संकटे झेलायची असा सवाल करत गोफणे म्हणाले की, मोठ्या उद्योगपतींना क्षणात करोडोंची कर्जमाफी मिळते. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे तसा भाव मिळतो, पण शेतकऱ्याच्या कुठल्या ही पिकाला आधारभूत किंमत कोणत्या ही सरकारकडून आजपर्यंत मिळालेली नाही. निवडणूकीमध्ये त्याच्या फक्त घोषणा होतात. नंतर सारे विसरुन जाते. काबाड कष्ट करुन उभा केलेले पीक जमीनवर लोळताना बघून होणा-या यातना शेतकरी झाल्याशिवाय कळणार नाहीत.
हवामान व वातावरणात होत असलेल्या बदलामुळे, येणाऱ्या काळात अशा स्वरुपात मोठा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतात असणारे कोणते पीक टिकेल असे कुठला ही प्रशासकीय अधिकारी व शेतकी अधिकारी सांगू शकत नाही, , त्यामुळे शेतकरी धीर खचल्याच्या अवस्थेत आहे. सरकारने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात व त्यांच्या पिकांना शासकीय आधारभूत किंमत मिळण्याबाबत निर्णय घ्यावा. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ही आवश्यक सूचना कराव्यात. शेतक-यांना फायदेशीर ठरतील असे कडक नियम लागू करावेत. ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँकेमधून विमा कापून गेला आहे.त्या शेतकऱ्यांना कृषीमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आदिंनी विमा कंपनी धारकांना तातडीने सूचना करून शेतकऱ्यांना विमासंरक्षण हे मिळवून दिले पाहिजे,अशी अपेक्षा गोफणे यांनी व्यक्त केली.
Published on: 08 September 2020, 04:38 IST